सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडले चौघांना​

नितीन बारवकर
Monday, 28 September 2020

जिल्हा ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (ता. २७) रात्री शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे- नगर रस्त्यावर चार तरुणांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, एक गावठी कट्टा व एक विनाक्रमांकाची अॅक्टिव्हा जप्त केली.

शिरूर (पुणे) : जिल्हा ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (ता. २७) रात्री शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे- नगर रस्त्यावर चार तरुणांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, एक गावठी कट्टा व एक विनाक्रमांकाची अॅक्टिव्हा जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी किरण हरिभाऊ सोनवणे (वय २५), सुनील रामदास सोनवणे (वय १९), संतोष गोरख मंडले (वय २२, सर्व रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. नगर) व कांतिलाल ऊर्फ हर्षराज रामदास शिंदे (वय २६, रा. बाभूळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरूरमधील तरुणांकडून पुण्यात १८ पिस्तूल जप्त केल्यानंतर पोलिस दलाने शिरूरवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते हे पथकासह काल (ता. २७) मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर परिसरात टेहेळणी करीत असताना, 'शिरूर बायपासवर चार तरुण संशयास्पदरीत्या फिरत असून, त्यांच्याकडे हत्यारे असण्याची शक्यता आहे,' अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून समजली. त्यानुसार त्यांनी शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस नाईक मुकुंद कुडेकर, पोलिस कॉन्स्टेबल करणसिंग जारवाल व दहशतवादविरोधी पथकातील जवानांसह घटनास्थळाची चोहोबाजूने नाकेबंदी केली.

जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

त्यावेळी बायपासवरील उड्डाणपुलाखाली चार तरुण संशयास्पदरीत्या वावरताना आढळले. मात्र, त्यांना पोलिसांच्या पाळतीचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आपल्याजवळील विनाक्रमांकाच्या दुचाकींवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकातील पोलिसांनी पाठलाग करून चौघांनाही पकडले. झडती घेतली असता तिघांच्या कंबरेला गावठी पिस्तूल; तर एकाच्या कंबरेला गावठी कट्टा आढळून आला. चौघांनाही शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पिस्तूल कशासाठी बाळगले होते, त्याचा काय वापर करणार होते, याबाबत पोलिस कसून माहिती घेत आहेत, असे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The four person were caught by the police