चौघी बहिणी करतात वडिलोपार्जित शेती; कशा ते वाचा

शेतातल्या पाझर तलावाकाठी विरंगुळ्याचे क्षण अनुभवताना माधवी, माधुरी व मिडोरी.
शेतातल्या पाझर तलावाकाठी विरंगुळ्याचे क्षण अनुभवताना माधवी, माधुरी व मिडोरी.

वडिलोपार्जित शेतीचा वारसा मुलांनीच चालवण्याची सामाजिक वहिवाट दिसते. मात्र हा वारसा लेकींनी जोमाने पुढे न्यायचं विरळ उदाहरण माधुरी, माधवी, नंदिनी व मिडोरी या चौघी बहिणींनी सार्थ ठरवलं आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील विंचुर्णी येथे त्या शेती करतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माधवी म्हणाली, ‘‘ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते बाबूलाल गांधी हे माझे काका. त्यांच्या कल्पनेतून, शंभर एकर जागेत साकारलेल्या या ‘स्मृतिवना’त आम्ही सगळे काम करतो. मी सोडून तिघी बहिणी लग्नानंतरसुद्धा आपापल्या जीवनसाथीसह येथे राबत आहेत. काकांचं वय आता ब्याण्णव असलं तरी त्यांचं मार्गदर्शन आजही आम्ही सतत घेतो. आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूदान चळवळीत काहींनी जमिनी दान केल्या. त्या भूमिहीनांना शेतीसाठी मिळाल्या, पण बऱ्याच जमिनी निकृष्ट होत्या. तेथे पाणी नव्हतं. अशा जमिनींमध्ये सुधारणा घडवण्यासाठी वृक्षतोड व पशूंचं चरणं थांबवणं तसंच कृत्रिम रासायनिक खतांशिवाय नैसर्गिकरीत्या जमिनीचा कस वाढवणं, यासंबंधीचे प्रयोग काकांनी केले. आमचं संपूर्ण कुटुंब त्यात सहभागी झालं.’

माधवीने असंही सांगितलं की, आम्ही बहिणी व आमचा धाकटा भाऊ योगेश, सारेच समानतेच्या वातावरणात लहानाचे मोठे झालो. लग्नानंतर मुलींनी सासरी जावं, शेतीचा कारभार फक्त मुलांकडेच वगैरे बुरसटलेल्या परंपरांना आमच्या परिवारात थारा नाही. उलट शेतीकडे आमचा कल पाहून आम्हाला या संदर्भात उपयोगी पडू शकणाऱ्या प्रगत शिक्षणासाठी घरातील सर्वांनी पाठिंबा दिला. मी पशुसंवर्धन तर माधुरीने फळबाग या विषयात पदवी घेतली. दोघी इस्राईलमधील शेतीचे प्रयोग जाणून घ्यायला तेथे गेलो. नंदिनी शेळ्या - मेंढ्यांच्या शास्त्रशुद्ध संगोपनाची पद्धत शिकली. मिडोरीने कृषिशास्त्रात पदवी प्राप्त केली. (मिडोरी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थच ‘हिरवळ’ असा आहे.) भावाने फार्मसीचा अभ्यासक्रम केला असला तरी त्यालाही शेतीची आवड आहे.

अत्यंत कमी पावसाच्या या भागात छोटे बांध घालून ठिकठिकाणी पाणी अडवलं आहे. पंचवीस एकर जागेवरील पाझरतलावात आता भरपूर पाणी असतं. जमिनीचे पाच भाग करून एके ठिकाणी गवताळ कुरण, दुसऱ्या भागात फळबाग, तिसऱ्या जागी औषधी वनस्पती, चौथ्या भागात वन उत्पादन आणि पाचव्या जागी गहू, ज्वारी आदी धान्य असे विभाग केले आहेत. आमच्या या स्मृतिवनात मोर नाचतात. स्थलांतरित पक्षी मुक्कामाला येतात. फुलपाखरं बागडतात. आम्ही या शेतीवर जिवापाड प्रेम करतो आणि तीही आम्हाला पीकपाण्यातून भरभरून माया देते.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com