मुळशीत पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला

मुळशी धरणातील पाण्याचा साठा.
मुळशी धरणातील पाण्याचा साठा.

पिरंगुट - मुळशीत पावसाने गेले चार दिवस दमदार व समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मुळशी धरण ७३ टक्के तर टेमघर धरण  ५० टक्के भरले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील मुठा, मोसे, कोळवण, रिहे, भादस, बेलावडे आदी खोऱ्यांत जोरदार तर पौडच्या पूर्वेकडील पिरंगुट, लवळे, माण परिसरातही समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर रखडलेल्या व लांबलेल्या भात लागवडींनी  वेग घेतला आहे. गेले तीन ते चार दिवस  मुळशीतील  सुरु झालेल्या या संततधार पावसाने सर्वत्र भातखाचरांत मुबलक पाणी साचल्याने आज अखेर ८८ टक्के भाताची लागवड झाली आहे. 

मागील महिन्यात पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनी टॅंकरने अथवा अन्य उपलब्ध ठिकाणचे पाणी आणून भाताच्या बियाणांच्या पेरणी केलेल्या शेतात सोडले होते. अनेक शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता शेतात पाणी सोडून रोपे तयार करायला सुरवात केली होती. सध्या होत असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट तर टळलेच शिवाय खोळंबलेली भात लावणीही अंतिम टप्प्यात आली आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर कासार आंबोली , पिरंगुट व लवळे आदी भागातील दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

कासार आंबोली (ता.मुळशी) येथील माजी सरपंच व शेतकरी राजेंद्र मारणे म्हणाले, 'मागच्या महिन्यात पावसाने दडी मारल्याने भात पीक हातचे निघून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या होत असलेला पाऊस म्हणजे मुळशीसाठी वरदान ठरला आहे. मात्र भातलागवडींनी नुसता  वेग घेतला नसून अंतिम टप्प्यात आल्या आहेत.  पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र सलग आणि संततधार पावसाने हातातोंडाशी  आलेली कडधान्याचे नुकसान झाले आहे . तरीही हा पाऊस लाभदायक ठरला आहे.'

प्रभारी तालुका कृषी अधिकारी  चंद्रशेखर जोशी म्हणाले, 'मुळशी तालुक्यात भातशेतीसाठी ७६६३ हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाते. यावर्षी आजअखेर ६८४६ हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाली आहे. मुळशीत संततधार होत असलेल्या पावसामुळे ही भात लागवड ८८ टक्के पूर्ण झालेली आहे. उशिरा जरी लागवड झाली तरी उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. या आठवड्यात बहुतांशी लागवड पूर्ण होईल. "

टाटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मुळशीत सलग होत असलेल्या पावसामुळे मुळशी धरण ७३ टक्के भरले आहे. तालुक्यात आज झालेला पाऊस मिमिमध्ये पुढीलप्रमाणे कंसात (या हंगामातील एकूण पाऊस) - मुळशी - ७८ मिमि (१६४९ मिमि), माले - ७३ मिमि (१४४६ मिमि), दावडी - २०१ मिमि (३५३४ मिमि), ताम्हिणी - २१५ मिमि (४७९० मिमि), शिरगाव - २१० मिमि (३७६९ मिमि), आंबवणे - २१४ मिमि (३१४९ मिमि). 

तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार , टेमघर धरण परिसरात आज ६० मिमि पावसाची नोंद झाली असून ते ५० टक्के भरले आहे. तालुक्यातील पाऊस पुढीलप्रमाणे - मुठा - ७५ मिमि, माले - ७३ मिमि, पौड - ५२ मिमि, घोटावडे - ७० मिमि, पिरंगुट - २४ मिमि व थेरगाव - ३५ मिमि. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com