esakal | रुग्णवाहिका चालकांच्या पगारामध्ये दरमहा चार हजारांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Four thousand per month increase in the salary of ambulance drivers

रुग्णवाहिका चालकांच्या पगारामध्ये दरमहा चार हजारांची वाढ

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : जीवावर उदार होऊन रुग्णांची ने-आण करण्यासाठी सेवा बजावत असलेल्या पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका चालकांना दरमहा चार हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असून त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. पुणे जिल्ह्यातील सुमारे 96 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका चालकांना याचा लाभ मिळणार आहे.

ग्रामपंचायतींचा चौदाव्या वित्त आयोगातील निधी वापरून खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खरेदी करण्यात आलेली रुग्णवाहिका चालका अभावी अनेक दिवस धूळखात पडून असल्याबाबतची बातमी 20 एप्रिल रोजी दै. 'सकाळ' मधून प्रसिद्ध झाली होती. सदर रुग्णवाहिकांना चालक पुरविणारी खाजगी एजन्सी चालकांना केवळ आठ हजार रुपये दरमहा पगार देत असल्याने चालक काम करण्यास नकार देत असल्याची बाब 'सकाळ'ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना रुग्णवाहिका चालकांना किमान दरमहा बारा हजार वेतन मिळेल असे सुधारित टेंडर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: कोरोनानंतरच्या ‘साइड इफेक्टकडे’ द्या विशेष लक्ष!

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका चालकांच्या शिष्टमंडळाने वेतनामध्ये वाढ व्हावी यासंदर्भात आज (ता.३) मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हेही उपस्थित होते. रुग्णवाहिका चालकांच्या शिष्टमंडळामध्ये गणेश कुटे (माण ता. मुळशी),सागर भोईने (माले ता.मुळशी),आशिष कोतवाल (पेरणे ता. हवेली) सागर जगताप (पळसदेव ता.इंदापूर)मुस्ताक शेख (राहू ता. दौंड) माऊली सरपाले ( करांजवने ता. वेल्हे) गणेश कोल्हे (देऊळगाव राजे ता.दौंड) धनंजय काटे (काटेवाडी ता.बारामती) किशोर घोटकुले(अढले ता.मावळ) यांचा समावेश होता.

हेही वाचा: सासू नंतर सुनेचा चारच दिवसात कोरोनामुळे मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना

'सकाळ'चे मानले आभार........

आतापर्यंत आम्ही अनेक राजकीय नेते, अधिकारी यांच्याकडे आमच्या सध्या मिळत असलेल्या कमी वेतनाचा विषय मांडला होता; परंतु कोणीही दखल घेत नव्हते. 'सकाळ'ने आमच्या व्यथा मांडल्याने प्रशासनाने दखल घेतली. आमच्याकडून व आमच्या परिवारांकडून 'सकाळ'चे आभार अशा शब्दांत रुग्णवाहिका चालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"नवीन व सुधारित रुग्णवाहिका चालकांच्या पुरवठ्या संदर्भातचे टेंडर तयार करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भविष्य निर्वाह निधी व इतर सर्व कपाती करून चालकांना किमान बारा हजार वेतन मिळेल अशा तरतुदी त्यामध्ये असतील.सदर कार्यवाही तातडीने करण्यात येईल."

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image