esakal | कोरोनानंतरच्या ‘साइड इफेक्टकडे’ द्या विशेष लक्ष!

बोलून बातमी शोधा

कोरोना
कोरोनानंतरच्या ‘साइड इफेक्टकडे’ द्या विशेष लक्ष!
sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : कोरोनातून बरे झालेल्या निवडक रुग्णांमध्ये ‘साइड इफेक्ट’ जाणवू शकतात. विशेष करून ‘म्युकोरोमायकॉसीस’ या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होत आहे. पुण्यासह राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. अशा वेळी रुग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे. शहरात यासंबंधीच्या हॉस्पिटलमध्ये २० ते २५ रूग्ण सध्या उपचार घेत असल्याचे डॉक्टर सांगता. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बऱ्या झालेल्या कोविड रुग्णांमध्ये हा संसर्ग आढळत आहे.

चिंचवड येथील मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अक्षय वाचासुंदर म्हणाले,‘‘कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत ‘म्युकोरमायकॉसीस’ या बुरशीजन्य आजाराचे रूग्ण वाढले आहेत. याचा मृत्यूदर हा ५४ टक्के असून, वेळेवर उपचार घेतल्यास आजारातून बाहेर पडता येते. कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉईडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पर्यायाने कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये हा आजार दिसू शकतो.’’ सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जिवाणू नाकामध्ये जातात. परंतु, रोगप्रतिकार शक्ती संतुलीत असल्यामुळे तिथे ‘म्युकोरमायकॉसीस’ या बुरशीची वाढ होत नाही. कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते, तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा: मृतदेहाच्या दफनसाठी जागाच शिल्लक नाही

म्युकोरमायकॉसीस घातक का?

 • या बुरशीचा संसर्गाचा वेग सर्वाधिक आणि उपचारासाठी वेळ कमी मिळतो

 • लवकर निदान झाले तर इंजेक्शनद्वारे उपचार शक्य, जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ

 • डोळ्यांपाशी संसर्ग पोचल्यास त्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता

 • मेंदू पर्यंत संसर्ग पोचल्यास उपचार करणे दुरापास्त होते.

या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

 • मधुमेह असणाऱ्यांनी

 • उच्च रक्तदाब असलेल्यांनी

 • कीटोॲसिडॉसीस

 • रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले

‘म्युकोरमायकॉसीस’ची लक्षणे

 • चेहऱ्यावर सूज येणे

 • गाल दुखणे

 • डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे

 • डोके दुखणे, नाक चोंदणे

 • रक्ताळ किंवा काळसर जखम

काय काळजी घ्याल

 • रोग प्रतिकारशक्ती संतुलीत होईल यासाठी प्रयत्न करणे

 • संबंधीत लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

 • म्युकोरोमायकॉसीस या बुरशीच्या प्रसाराचा वेग जास्त आहे त्यामुळे उपचारासाठी टाळाटाळ करू नका

 • रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलीत करा, रक्तदाब नियंत्रीत करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या

कोरोना नंतर कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे नाकामध्ये या बुरशीची वाढ होऊ शकते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदूकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्यास इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार करता येतात. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पाच ते सात दिवसांत किंवा महिन्याभरानंतरही ही लक्षणे दिसू शकतात.

- डॉ. अक्षय वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ