पुणे : कोरोनाच्या संकंटात रोजगार हमीचा आधार; चार हजार कुटुंबांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

आजखेरपर्यंत जिल्ह्यातील ३३८ ग्रामपंचायतींनी रोजगार हमीची ६९६ कामे सुरू केली आहेत‌. यामुळे जिल्ह्यातील चार हजार ४१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

पुणे : लॉकडाउनच्या रोजगाराअभावी मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात जिल्हा परिषदेच्या पुढाकाराला यश आले आहे. आजखेरपर्यंत जिल्ह्यातील ३३८ ग्रामपंचायतींनी ६९६ कामे सुरू केली आहेत‌. यामुळे जिल्ह्यातील चार हजार ४१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

मुख्य बातमी वाचा - दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी रोजगार हमीची किमान तीन ते पाच कामे त्वरीत मंजूर करण्याचा आणि त्वरीत सुरू करण्याचा आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिला होता. अशी कामे सुरू न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रसाद यांनी यावेळी दिला होता. 

या कामांवर अन्य जिल्हा किंवा राज्यातील मजुरांनाही रोजगार देण्याचे बजावण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागात मागेल त्याला रोजगार हमीचे काम मिळू लागले आहे. यामुळे रोजगाराअभावी होणारी संभाव्य उपासमार टळणार असल्याचे मत प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे जिल्ह्याचा रोजगार हमी योजनेचा सुमारे १०६ कोटी रुपयांचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे २५ हजार कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी निम्मी कामे ग्रामपंचायतींमार्फत तर उर्वरित निम्मी कामे राज्य सरकारच्या अन्य विविध यंत्रणांमार्फत केली जाणार आहेत. यानुसार ग्रामपंचायतींमार्फत वर्षभरात सुमारे साडेबारा हजार कामे केली जाणार आहेत. या कामांच्या माध्यमातून ६० हजार मजुरांना काम मिळू शकणार आहे.

आणखी वाचा - बंगलाच्या उपसागरात चक्रिवादळाची तीव्रता वाढली; जाणून घ्या अपडेट्स  

तालुकानिहाय सुरु असलेल्या कामांची संख्या अशी :- आंबेगाव -३३, बारामती -७१,  भोर -८५, दौंड -४३, हवेली -१३, इंदापूर-१२८, जुन्नर -९२, खेड -४३, मावळ -७६, मुळशी - ०५, पुरंदर -२१, शिरूर -७५ आणि वेल्हे -१३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thousand workers work due to employment guarantee