चार बटणे न दाबल्यास मत होणार बाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनवरील (ईव्हीएम) चारही गटांतील चार बटणे न दाबल्यास त्यांचे मत बाद होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले. 

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनवरील (ईव्हीएम) चारही गटांतील चार बटणे न दाबल्यास त्यांचे मत बाद होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले. 

निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. मतदान करताना चार गटांतील बटणे दाबली नाही, तर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच एका गटातील बटण पुन्हा दाबता येणार नाही. एकदा एका गटातील बटण दाबले, की त्या गटातील अन्य बटणे आपोआप लॉक होणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. मतदारांना एखाद्या गटातील उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास त्यांनी ‘नोटा’चे (नन ऑफ द अबॉव्ह) बटण दाबणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार बटणे दाबणे बंधनकारक असेल. 

एका ईव्हीएम मशिनवर १५ बटणे असतील. एखाद्या गटात सातच उमेदवार असतील तर आठवे बटण ‘नोटा’चे, नववे बटण लॉक असेल. त्यापुढे १० व्या बटणापासून दुसरा गट सुरू होणार आहे. त्यामुळे एका ‘ईव्हीएम’वर एका पक्षाचे चिन्ह दोन वेळा येऊ शकते. या पद्धतीवर अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम मशिन असावे, अशी त्यांची मागणी आहे. या बाबत कुलकर्णी म्हणाले, ‘‘कमीत कमी ‘ईव्हीएम’च्या संख्येत उमेदवारांची रचना करावी, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एखाद्या प्रभागात चारही गटांतील उमेदवार संख्या कमी असल्यास तीन ‘ईव्हीएम’ मशिनमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चार गटांसाठी चार रंग 
प्रभागातील चारही गट ‘ईव्हीएम’वर मतदारांना ओळखणे सोपे जावे, यासाठी प्रशासनाने रंग निश्‍चित केले आहेत. अ गटासाठी पांढरा रंग, ब गटासाठी फिकट गुलाबी, क गटासाठी फिकट पिवळा आणि ड गटासाठी फिकट निळा रंग ‘ईव्हीएम’वर असेल. या शिवाय प्रभागाचे नाव, क्रमांक आदींचीही माहिती त्यावर असेल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Web Title: four time press vote button