बंद मोटारीतील प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

रस्त्याच्या कडेला कव्हर टाकून मोटार पार्क केलेली; मात्र गाडीतून एसीचा आवाज येत होता. गाडीत लहान मुले अडकली असल्याची शक्‍यता असल्याने एका आजीबाईंनी पुढाकार घेत नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी गाडीचे कव्हर वर केले आणि गाडीत अश्‍लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले. ही घटना आहे, कोथरूडमधील परमहंसनगरची.

पौडरस्ता - रस्त्याच्या कडेला कव्हर टाकून मोटार पार्क केलेली; मात्र गाडीतून एसीचा आवाज येत होता. गाडीत लहान मुले अडकली असल्याची शक्‍यता असल्याने एका आजीबाईंनी पुढाकार घेत नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी गाडीचे कव्हर वर केले आणि गाडीत अश्‍लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले. ही घटना आहे, कोथरूडमधील परमहंसनगरची.

परमहंसनगरमध्ये मिलेट्री गेटजवळ लावलेल्या गाडीवर कव्हर टाकलेले होते; परंतु आतून एसी चालू असल्याचा आवाज ऐकू येत असल्याने शेजारील बंगल्यात राहणाऱ्या आजींना आश्‍चर्य वाटले. गाडीमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी दूरदर्शनवर पाहिल्यामुळे आजींची चिंता वाढली. असाच काहीसा हा प्रकार असेल असे वाटले. त्यांनी आसपासच्या रहिवाशांकडे या गाडीच्या मालकाबाबत चौकशी केली. मात्र आपल्याकडे कोणीही पाहुणे आलेले नसल्याचे लगतच्या रहिवाशांनी त्या आजींना सांगितले. आजींनी याबाबत सोसायटीच्या अध्यक्षांना कळवले. अध्यक्ष काही नागरिकांना घेऊन गाडीजवळ आले.

गाडीवर कव्हर होते; परंतु आतून एसी सुरू असल्याचा आवाज येत होता. कोणीतरी गाडी लावली असेल आणि एसी तसाच चालू राहिला असेल, असे वाटल्याने अध्यक्षांनी कव्हर वर केले आणि आश्‍चर्याचा धक्काच बसला. 
या गाडीत एक प्रेमी युगल चाळे करत असल्याचे त्यांना दिसले. रहिवाशांनी या जोडप्याला फटकारले. अध्यक्षांनी त्यांना समज देत तेथून पिटाळून लावले.

परमहंसनगर भागात रस्ता मोठा असल्याने तेथे वाहने पार्क करण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी या भागात लावलेल्या वाहनांमधील टेप, बॅटऱ्या चोरी गेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. ज्या गाड्यांचा आमच्या सोसायटीतील रहिवाशांशी संबंध नाही, त्यांना येथे पार्किंगपासून कसे रोखावे, हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे. आज घडलेल्या प्रकारामुळे येथे गाडीमध्ये अनैतिक धंदे चालतात की काय? अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.

यासंदर्भात पोलिसात तक्रार केलेली नाही; परंतु पोलिसांनी अशा गोष्टींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Wheeler Lovers Obscene