पारवडीत सामुदायिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपी विवाहबध्द

संतोष आटोळे 
रविवार, 6 मे 2018

या सोहळ्याचे हे अकरावे वर्ष होते. गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक यांसह सर्वच क्षेत्रातील ग्रामस्थांनी एकत्रित येवुन हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.

शिर्सुफळ - पारवडी (ता. बारामती) येथे श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला.यामध्ये 14 जोडपी विवाहबद्ध झाली.

समाजामध्ये आर्थिक विवंचनेत असणारी अनेक कुटुंबे विवाहाच्या खर्चामुळे कर्जबाजारी होऊन अधिक अडचणीत येत असतात या प्रश्नाचा विचार करीत सामुदायिक विवाह चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी पारवडी ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातुन कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्याक्ष व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे हे अकरावे वर्ष होते. गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक यांसह सर्वच क्षेत्रातील ग्रामस्थांनी एकत्रित येवुन हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.

याप्रसंगी वधुवरांना शुभार्शिवाद देताना बाळासाहेब गावडे म्हणाले, सामुदायिक विवाह सोहळे हे विशिष्ठ ठिकाणीच न होता गावोगावी होणे आवश्यक आहेत. विवाह समारंभात सत्कार व इतर अनावश्यक खर्च टाळुन साध्या पध्दतीने विवाह पार पाडणे ही काळाची गरज बनली आहे.यासाठी समाजात जनजागृती झाली पाहिजे. यासाठी समाजातील सर्वच प्रतिष्ठीतांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.

विवाह सोहळा यशस्वीतेसाठी गावातील युवक मंडळींपासुन जेष्ठांनी सहभाग घेतला.या सोहळ्याचे सुत्रसंचालन संभाजी मेरगळ, प्रगती पोंदकुले यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत माजी पंचायती समिती सदस्य तानाजी गावडे, माजी सरपंच संगिता गावडे, विद्यमान सरपंच जिजाबा गावडे, उपसरपंच अनिल आटोळे यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी केले.    

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fourteen Couples Married at Parvadit Community Weddings