पाबळमधील तेरा विश्‍वस्तांवर फसवणूक व अपहाराचा गुन्हा

भरत पचंगे
गुरुवार, 17 मे 2018

पाबळ येथील विश्‍वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठान; शिरूर न्यायालयाचा आदेश

शिक्रापूर: बोगस नोंदणी क्रमांकाने भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी गोळा करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून पाबळ (ता. शिरूर) येथील विश्वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठानच्या 13 विश्वस्तांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 16) फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला. शिरूर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.

पाबळ येथील विश्‍वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठान; शिरूर न्यायालयाचा आदेश

शिक्रापूर: बोगस नोंदणी क्रमांकाने भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी गोळा करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून पाबळ (ता. शिरूर) येथील विश्वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठानच्या 13 विश्वस्तांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 16) फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला. शिरूर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळ येथील पंकज जयंतीलाल गुजर (शहा) हे गेल्या काही वर्षांपासून पाबळ जैन मंदिराच्या गैरकारभाराबाबत चौकशीची मागणी करीत होते. याबाबत त्यांनी शिरूर न्यायालयात तक्रारही केली होती. पाबळ येथील जैन मंदिराचा कारभार श्री पद्ममणी जैन श्वेतांबर तीर्थपेढी (नोंदणी क्र.252) या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. पाबळ येथील विश्वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठान (नोंदणी क्र.3366) यांचेमार्फत गोशाळा चालविण्यात येते. विश्वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठानने श्री पद्ममणी जैन अबोल प्राणी रक्षा केंद्र या बोगस नावाने लेटरहेड, पावती पुस्तक छापून त्यावर नोंदणी क्रमांक 3366 टाकून भाविकांकडून देणग्या घेतल्या. सदर रकमा विश्वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठानच्या बॅंक खात्यात जमा न करता त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व महाराष्ट्र बॅंकेतील श्री पद्ममणी जैन अबोल प्राणी रक्षा केंद्र या खात्यात जमा करण्यात आल्या. यात मोठा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार गुजर यांनी केली होती.

शिरूर न्यायालयाने गुजर यांची तक्रार ग्राह्य धरून शिक्रापूर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार विश्वकल्याण जीव रक्षा प्रतिष्ठानचे विश्वस्त रामजी रावजी मेहता, अभिनंदन रामलाल सुंदेचा-मुथ्था (दोघेही रा. बारामती), मदनलाल देविचंद ओस्तवाल (रा. शिवाजी चौक, दौंड), घेसुलाल नगरराजजी जैन (रा. दौंड), सतीश कुंदनमल गांधी व प्रकाश श्रेणीकलाल शहा (रा. पाबळ, ता. शिरूर), अनिल चुनिलाल गुगळे (पवनानगर, चिंचवड) आदींसह रसिकलाल दगडूलाल कटारिया, तेजपाल छोटालाल शहा व सुभाष झुंबरलाल मुथ्था (रा. नगर), प्रफुल्लकुमार शांतिलाल मेहता (रा. श्रीगोंदा, जि. नगर), प्रमोद माणिकचंद गांधी (रा. वांबोरी, ता. राहुरी), रिखबचंद लालचंद शहा (रा. लोणंद, ता. खंडाळा) आदींवर फसवणूक व आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी फरारी झाल्याची माहिती गिरीगोसावी यांनी दिली.

धर्मादाय आयुक्तांचा असहकार
याबाबतची तक्रार शिक्रापूर पोलिसांकडे सहा महिन्यांपूर्वीच दाखल झाली होती. मात्र, बोगस ट्रस्टची खातरजमा धर्मादाय आयुक्त कार्यालयाने करणे गरजेचे असताना त्यांनी सहकार्य केले नाही, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

Web Title: Fraud and Abduction Crime on Thirteen Trustees in Pabal