पुण्यात तिघांची पावणेपाच लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

शहरामध्ये वेगवेगळी कारणे सांगून दोन महिलांसह तिघांची तब्बल पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

पुणे - वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून नागरिकांचे ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. नोकरी, विवाह, बक्षिसासह डेबिट व क्रेडिट कार्डच्या क्रमांकाची बेरीज करण्यास सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. काही दिवसांत शहरामध्ये वेगवेगळी कारणे सांगून दोन महिलांसह तिघांची तब्बल पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवे खरेदी केलेले कपडे बदलून घेण्यासाठी वेबसाईटवरील क्रमांकाद्वारे कंपनीशी संपर्क साधणाऱ्या महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी धनकवडी येथे राहणाऱ्या 46 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी ओजाला ऑनलाइनकडून कपडे खरेदी केले होते. मात्र काही कपड्यांचे माप कमी असल्याने ते परत करण्यासाठी त्यांनी इंटरनेटवरून संबंधित कंपनीचा ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक घेतला. त्यावर संपर्क साधून कपडे बदलून घेण्याबाबत विचारणा केली. त्या वेळी फिर्यादी यांना बॅंक खाते क्रमांक व डेबिट कार्ड क्रमांक यांची बेरीज करून आलेली संख्या किती आहे, असा प्रश्‍न विचारला. त्यानंतर फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातून एक लाख रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तींनी काढून घेतली. 

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित ओळख वाढवून अनोळखी व्यक्तीने तिची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी उंड्री येथील 29 वर्षीय तरुणीने अनोळखी व्यक्तीविरुद्ध कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 पासून सुरू आहे. फिर्यादी यांनी विवाहासाठी नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळावर स्वतःबद्दल माहिती दिली होती. त्यावरून अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क साधला. लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर आपण भारतात आलो असून, विमानतळावर सीमाशुल्क विभागात तत्काळ पैसे भरायचे असल्याचे सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी अडीच लाख रुपये घेतले. फिर्यादी यांनी नंतर संपर्क साधला, त्या वेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. 

ओएलएक्‍सवरून बुलेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाही अनोळखी व्यक्तींनी सव्वा लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी प्रसाद घोरपडे (वय 21, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना बुलेट घ्यायची होती. त्याच वेळी त्यांना ओएलएक्‍सवर एका बुलेटची जाहिरात दिसली. त्यानुसार त्यांनी दुचाकीच्या मालकाशी संपर्क केला. त्या वेळी फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करून विविध कारणे सांगून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये ऑनलाइनद्वारे काढून घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud through online in pune