मोफत आधार कार्ड योजनेला सुरुंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

भोसरीत कार्डमागे पाचशे रुपये उकळतात
भोसरी - केंद्र सरकारची आधार कार्ड काढण्याची सुविधा मोफत असतानाही भोसरी परिसरातील नागरी सुविधा केंद्रातून एका कार्डसाठी साडेतीनशे ते पाचशे रुपये आकारले जात आहेत. सरकारकडून सुविधा केंद्राला प्रत्येक कार्डमागे पैसे दिले जात असताना ही लूट सुरू आहे. पर्यायाने केंद्राच्या मोफत कार्ड देण्याच्या योजनेला सुरुंग लागला आहे. या सुविधा केंद्राला टाळे लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भोसरीत कार्डमागे पाचशे रुपये उकळतात
भोसरी - केंद्र सरकारची आधार कार्ड काढण्याची सुविधा मोफत असतानाही भोसरी परिसरातील नागरी सुविधा केंद्रातून एका कार्डसाठी साडेतीनशे ते पाचशे रुपये आकारले जात आहेत. सरकारकडून सुविधा केंद्राला प्रत्येक कार्डमागे पैसे दिले जात असताना ही लूट सुरू आहे. पर्यायाने केंद्राच्या मोफत कार्ड देण्याच्या योजनेला सुरुंग लागला आहे. या सुविधा केंद्राला टाळे लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भोसरी परिसरात खासगी नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे या केंद्रावर आधार कार्ड काढण्याचीही सुविधा असल्याचे फलक लावले आहेत. आधार कार्ड काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तीनशे ते पाचशे रुपये सांगितले जातात. पैसे भरल्यानंतर नागरिकाला आधार कार्डासाठी सुविधा केंद्रात पाठविले जाते. दिघी रस्ता परिसर, भोसरीतील गवळीनगर त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही आधार कार्डासाठी राजरोसपणे पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत.

केंद्राने नागरिकांना जवळच्या परिसरात आधार कार्ड सहज काढता यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित ठिकाणी खासगी केंद्रचालकांना आधार कार्ड देण्याची सुविधा दिली आहे. एका कार्डसाठी खासगी केंद्र चालकाला चाळीस रुपये दिले जात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी दिली.

त्याचप्रमाणे आधार कार्ड काढणाऱ्यांकडून कोणतीही फी न घेण्याचे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. परंतु भोसरीत खासगी केंद्राद्वारे सर्रासपणे पैसे उकळले जात आहेत. या विषयी एका केंद्र चालकास हटकले असता आम्ही इतर साहित्यही (संगणक, झेरॉक्‍स मशिन) यासाठी वापरत असल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या एकाने एका कंपनीचे यंत्र बंद झाल्यावर दुसऱ्या कंपनीचे यंत्र घेतो. त्यामुळे कारवाईला घाबरत नसल्याचे सांगितले.

नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आधार कार्डासाठी पैसे उकळणाऱ्या खासगी केंद्रावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे महापालिकेद्वारे आधार कार्ड केंद्र मध्यवर्ती ठिकाणी सुरू करून त्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मागणीही होत आहे.

आधार कार्डसाठी खासगी केंद्र चालकाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुविधा दिली आहे. ही सुविधा नागरिकांसाठी पूर्णतः मोफत आहे. पैसे उकळणाऱ्या केंद्राची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी. संबंधित चालकांवर कडक कारावाई केली जाईल. भोसरी परिसरातील केंद्राची स्क्वॉडद्वारे माहिती घेण्यात येणार आहे. नागरिकांनी पैसे उकळणाऱ्या सुविधा केंद्राची माहिती महापालिकेपर्यंत पोचवावी.
- डॉ. यशवंतराव माने, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

आधार कार्ड केंद्रासाठीची तपासणी यंत्रणा स्वतंत्र आहे. नागरिकांद्वारे आधार कार्डासाठी पैसे उकळणाऱ्या केंद्र चालकांविरोधात तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. केंद्रचालकास दुसरे यंत्र व ऑपरेटर न मिळू देण्याचाही प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे अशा केंद्रचालकाचे हार्डवेअरही ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. जेणेकरून ते पुन्हा आधार कार्डच्या कामासाठी वापरले जाणार नाही.
- समीक्षा चंद्राकर गोकुडे, उपजिल्हाधिकारी, पुणे निवडणूक विभाग

Web Title: free aadhar card issue