सीईटी अर्जासाठी आता विनामूल्य मार्गदर्शन

CET-Form
CET-Form

पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचा किंवा प्रत्यक्ष प्रवेशाचा अर्ज भरताना तुमचा गोंधळ उडत असेल, तर येत्या वर्षापासून हे होणार नाही. होय, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा आणि प्रत्यक्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज बिनचूक भरता यावा, यासाठी आगामी वर्षापासून विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) समुपदेशन केंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते. 

या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. दरम्यान, परीक्षेसाठी आणि प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थी चुकीची किंवा अपुरी माहिती भरत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून निदर्शनास येत आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा कक्षातर्फे समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवेश परीक्षेचे केंद्र असणारी महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये केंद्र असावे, यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच समुपदेशनासाठी एजन्सीमार्फत मार्गदर्शकांचा शोधही घेतला जाणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे परीक्षा कक्षातर्फे आत्तापर्यंत या प्रकारचे समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आले नव्हते. मात्र, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी हे केंद्र असणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचा आणि प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लवकरच समुपदेशन केंद्रामार्फत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या सीईटी ज्या केंद्रावर (शिक्षण संस्था) घेतली जाते, त्या संस्थांमध्ये समुपदेशन केंद्रासाठी जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना तालुका स्तरावरील समुपदेशन केंद्राद्वारे मार्गदर्शन मिळेल.
- आनंद रायते, आयुक्त, सीईटी-सेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com