esakal | मोफत ऑक्सिजन देणारी 'माणसं' ; 3 लाखांची पदरमोड करून वाचवले 20 जणांचे प्राण

बोलून बातमी शोधा

मोफत ऑक्सिजन देणारी 'माणसं' ; 3 लाखांची पदरमोड करून वाचवले 20 जणांचे प्राण
मोफत ऑक्सिजन देणारी 'माणसं' ; 3 लाखांची पदरमोड करून वाचवले 20 जणांचे प्राण
sakal_logo
By
अन्वर मोमिन

वडगाव शेरी : पुण्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. तर ऑक्सिजन बेडसाठी अनेकांची आजही धावपळ सुरू आहे. अशा रुग्णांना बेड मिळेपर्यंत मोफत ऑक्सीजन सेवा देण्याचे काम लोहगाव मधील एक तरुण करीत आहे. विशेष म्हणजे तीनच दिवसात या सेवेमुळे सुमारे वीसहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. भुमाता युवा संघटनेने डॉ. बुधाजीराव मुळीक फाउंडेशन स्थापन करून अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी करोना रुग्णांकरिता ऑक्सिजनची 24 तास मोफत सेवा देणे सुरू केले आहे. या कामात त्यांचे सहकारी अभिजीत साळवे आणि इतर पदाधिकारी मदत करीत आहेत. प्रशांत जगताप यांच्या घरी त्यांच्या भावाचे लग्न असल्यामुळे काही रक्कम हाताशी होती. मे महिन्यात भावाचे लग्नही ठरलेले आहे. परंतु करोणाचे संकट लक्षात घेत लग्नाचा खर्च जगताप कुटुंबियांनी कोरोना रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या उपक्रमासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. सुमारे तीन लाख रुपये खर्च करून 36 सिलेंडर विकत घेऊन त्यात ऑक्सिजन भरून आणण्यात आला. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना ऑक्सिजन किट लावण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली.

हेही वाचा: 'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

तीन दिवसापूर्वी लोहगाव आणि नगर रस्ता परिसरात ही सेवा देण्याचे काम सुरू करण्यात आले. तीनच दिवसात सुमारे वीसहून अधिक रुग्णांनी जगताप यांच्याशी संपर्क साधून रुग्णाला ऑक्सीजन बेड मिळत नसल्यामुळे ऑक्सिजनची गरज असल्याचे सांगितले व सेवेचा लाभ घेतला. याविषयी प्रशांत जगताप म्हणाले, रुग्णाच्या नातेवाईकाने आमच्याशी संपर्क केल्यावर आम्ही रुग्णाच्या डॉक्टरांशी बोलून ऑक्सिजनची गरज असल्याची खातरजमा करतो. त्यानंतर डॉक्टरांची चिठ्ठी पाहून पेशंटला ऑक्सीजन बेड मिळत नाही तोपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर किट देऊन ही सेवा देतो. तीन दिवसात वीस पेक्षा जास्त रुग्णांना आमच्या सेवेचा लाभ झाला. आम्ही त्यांचे प्राण वाचू शकलो याचे समाधान आहे.

कोरोना बाधित आईची ऑक्सिजन पातळी खूप कमी झाली होती. ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. आम्हाला माहिती समजल्यावर आम्ही रात्री दीड वाजता प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बेड मिळेपर्यंत दोन वेळा ऑक्सीजन सिलेंडर आणून आम्ही आईचा प्राण वाचवला. खूप चांगली मदत झाली. त्यांनी रात्री डिड वाजता ऑक्सिजन सिलेंडर किट दिले. त्यांचे उपकार शब्दात व्यक्त करू शकत नाही.

- दिलीप मलिक