झाडांना खिळेमुक्त करून त्यांचा कोंडलेला श्वास केला मोकळा

संदिप जगदाळे
रविवार, 3 जून 2018

हडपसर : पोस्टर लावण्यासाठी मोकळी जागा नाही? झाड आहेच की, बॅनर लावायचाय? बघा एखादा डेरेदार वृक्ष. ठोका झाडावर खिळे. या जाहिरातबाजीमुळे असंख्य ठिकाणी खिळे ठोकलेले हे वृक्ष जणू वेदनेने विव्हळत आहेत. झाडांच्या या नि:शब्द वेदना ओळखून पुणे महानगरपालिका व अंघोळीची गोळी या सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विदयमाने वानवडी येथील शिवरकर रस्त्यावरील ३६ झाडांवरील ३५१ खिळे काढले. 

नगरसेवक प्रशांत जगताप म्हणाले, जाहिरात करण्यासाठी जागा नसल्याने प्रसंगी झाडांचा वापर केला जातो. बॅनर पोस्टर घट्ट बसावा, म्हणून चारी बाजूंनी खिळे ठोकले जातात. काही महाभाग तर, पत्र्यावर जाहिरात करून पत्राच झाडाला ठोकतात. झाडांवर ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात. तो गंज झाडाच्या बुंध्यात उतरतो. परिणामी झाडावर हळूहळू परिणाम होतो आणि झाड खंगत जाते. त्यामुळे झाडांमध्ये ठोकलेले हे खिळे काढण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. यापुढे प्रभागात झाडांवर खिळे ठोकणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच जर कोणी झाडांना खिळे ठोकताना दिसला तर त्याचा फोटो काढून प्रभाग कार्यालयात द्यावा, त्यावरून त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल"

यावेळी रस्त्याच्या कडेला असणा-या झाडांना जाहिरात फलकांसाठी मारण्यात आलेले खिळे, पिना, बांधण्यात आलेल्या तारा आशा झाडांच्या जीवावर बेतणा-या गोष्टी काढून टाकून झाडालाही मुक्त श्वास घेता यावा यासाठी प्रयत्न करण्यात आला. जाहिरात फलक काढून स्थानिक दुकानदारांचे प्रबोधन करून झाडांची काळजी घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आले. 

या अभियानात नगरसेवक प्रशांत जगताप, सहाय्यक महापालिका आयुक्त संजय गावडे, सहाय्यक अभियंता कुंजन जाधव, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक अनिल डोळे, निखील निकम, संजय सांळुखे, उदयान निरिक्षक बाळासाहेब डोळस, आंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील, शर्वरी पाटील, विकास उगळे, अमोल बोरसे, सुकृत कुलकर्णी यांनी या अभियानात सहभाग घेतला. 

Web Title: free the plants and make them feel stale and breathe