शेवटच्या सोमवारी करा पीएमपीने मोफत प्रवास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

पुणे : सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पुणेकरांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोफत "पीएमपी' प्रवास करता येणार आहे. पुढील महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

पुणे : सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पुणेकरांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोफत "पीएमपी' प्रवास करता येणार आहे. पुढील महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

शहरात गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. परिणामी प्रदूषणही वाढत आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडत असल्यानेच वाहतुकीची समस्या बिकट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

त्याचाच भाग म्हणून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पुणेकरांना मोफत "पीएमपी' प्रवास उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव माजी उपमहापौर आणि नगरसेवक आबा बागूल यांनी महापालिका प्रशासनाकडे दिला होता. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या प्रयोगादरम्यान महिन्यातून दोनदा मोफत प्रवास देण्यात यावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. त्यावर महापालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्रायही नोंदविला होता. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके म्हणाले, ""पीएमपी सक्षम करण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त ठरणार असून, त्याची प्रभापवीणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. ही मंजुरी मिळताच अंमलबजावणी होईल.''

""रस्त्यावरील खासगी वाहने कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग राबविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, वाहनांमुळे होणारे प्रदूषणही कमी होईल. मोफत "पीएमपी' प्रवासाची सुविधा देताना तिचे योग्य नियोजन करायला हवे,'' असे बागूल यांनी सांगितले.
 

Web Title: Free travel on the last Monday of PMP