दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना मोफत उपचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे  - दारिद्य्ररेषेखालील अत्यवस्थ स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर धर्मादाय न्यासाअंतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार द्यावेत, अशी सूचना दिल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी सांगितले. 

पुणे  - दारिद्य्ररेषेखालील अत्यवस्थ स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर धर्मादाय न्यासाअंतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार द्यावेत, अशी सूचना दिल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी सांगितले. 

राज्यात या महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे दौऱ्यावर आलेल्या डॉ. सावंत यांनी आढावा बैठकीत हा आदेश दिला. या वेळी त्यांनी डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय आणि पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल स्वाइन फ्लूच्या रुग्णांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. 

स्वाइन फ्लूच्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचारांसाठी मोठा खर्च येतो. हा खर्च दारिद्य्ररेषेखालील नागरिकांच्या आवाक्‍याबाहेरचा असतो. त्यामुळे धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या खाटांच्या क्षमतेच्या दहा टक्के रुग्णांवर मोफत उपचाराच्या योजनेतून अशा रुग्णांवर वैद्यकीय उपचार करावेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. 

स्वाइन फ्लूच्या अत्यवस्थ रुग्णांना महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोज भेटून त्यांची तपासणी करण्याची सूचनाही डॉ. सावंत यांनी केली. 

संसर्गाचे प्रमाण वाढले 
डॉ. सावंत यांच्या बैठकीत राष्ट्रीय विषाणू संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांनी स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण नोंदविले. मात्र, विषाणूंच्या रचनेत कोणताही बदल झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या वापरण्यात येणारी स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस आणि औषध या विषाणूंवर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतील, असाही विश्‍वास या तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

स्वाइन फ्लू बरा करण्यासाठी त्याचे लवकर निदान आणि अचूक उपचार करणे आवश्‍यक असते. लक्षणे दिसल्यापासून 48 तासांमध्ये उपचारांना सुरवात झाली पाहिजे. त्यासाठी रुग्णांनी लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घ्यावा. 
- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, पुणे आरोग्य परिमंडळ 

 

ढगाळ वातावरणामुळे राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या नियंत्रणात राहिली आहे. 
डॉ. प्रदीप आवटे, साथ रोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य 
 

दृष्टिक्षेपात स्वाइन फ्लू 
वर्ष ............... रुग्णांची संख्या ...... मृत्यू 
ऑगस्ट 2018 .......138 ............ 24 
2017 ......... 6887 ............ 778 
(स्त्रोत - सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य) 

Web Title: Free treatment for below poverty line