मित्रानेच अपहरण करून केला मित्राचा खून 

मित्रानेच अपहरण करून केला मित्राचा खून 

पुणे/वारजे - दहावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाचा त्याच्या मित्रानेच अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. खंडणी मिळविण्याच्या हेतूने हा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तरीही या खुनामागे आणखी वेगळे कारण असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही घटना वारजे माळवाडी परिसरात घडली.  

निखिल अनंत आंग्रोळकर (वय १५, रा. विठठ्‌लनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. विनयसिंग वीरेंद्रसिंग राजपूत (वय २३, रा. हिंगणे बिल्डिंग, विठ्ठलनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. निखिल हा रविवारी घरातून बाहेर गेल्यानंतर माघारी परतला नव्हता. त्याबाबत वडिलांनी अनंत आंग्रोळकर यांनी सोमवारी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 

पोलिस तपास करत असताना निखिल यास राजपुतबरोबर जाताना नागरिकांनी पाहिल्याची खबर पोलिसांना मिळाली. तसेच राजपूत हा आपल्याला जबरदस्तीने घेऊन जात असल्याबाबत निखिलने वडिलांना फोन करून सांगितले. त्यामुळे पोलिसांनी राजपुतला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आपण वारजे येथील डुक्करखिंडीजवळ असलेल्या दोडके फार्महाऊसपासून काही अंतरावर निखिलचा गळा आवळून खून केल्याचे आणि जवळच असलेल्या राडारोड्यात निखिलचा मृतदेह पुरल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते, पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश खांडेकर तपास करीत आहेत.

एकुलता एक मुलगा
अनंत आंगरोळकर यांचा निखिल हा एकुलता एक मुलगा. त्यास तीन बहिणी आहेत. निखिल हा मॉर्डन शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सोमवारी त्याची दहावीची सराव परीक्षा सुरू होणार होती. निखिलचा खून झाल्याची बातमी कानावर पडताच आंगरोळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

काहीच घडले नाहीचा आविर्भाव
राजपूत व निखिल हे दोघेही शेजारीच राहात होते. त्यामुळे त्या दोघांची मैत्री होती. राजपूत हा एका जिममध्ये काम करत होता. राजपुतला २५ हजार रुपयांची गरज होती. घटनेपूर्वी निखिलचे वडील गवंड्यास दहा हजार रुपये देताना राजपुतने पाहिले होते. त्यानंतर त्याने निखिलला गाडीवरून नेऊन त्याचा खून केला. त्यानंतरही राजपूत हा निखिलच्या घरी काहीच घडले नाही, अशा आविर्भावात नेहमीप्रमाणे येत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com