वटवृक्षासारखी विस्तारलेली सात जणांची मैत्री

नीला शर्मा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - कथा, कादंबरी किंवा चित्रपटातली वाटावी अशी ही खरीखुरी गोष्ट आहे. गोष्ट कसली? वर्तमान आहे. शाळकरी वयापासून त्या सात जणांमध्ये मैत्रीचे धागे इतके घट्ट विणले जात राहिले, की त्यांचे पालक, नंतर पत्नी आणि पुढे मुलंही त्यात आपसूक ओढली जाऊन एक व्यापक कुटुंब झालं. कुठल्याही नात्याचा जीव क्षणभंगूर होत चाललेल्या या काळात स्वप्नवत वाटावी अशा मैत्रीचा वाढदिवस आज (३१ डिसेंबर) साजरा होत आहे. 

हे अनोखे आप्तस्वकीय आहेत डॉ. सदानंद बोरसे, सतीश शेवाळकर, प्रमोद लिमये, धनंजय चिंचवडकर, रवींद्र कुलकर्णी, डॉ. राजीव जोशी व देवेंद्र लंके. इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंतची सात वर्षं एकाच वर्गात राहिलेले हे सवंगडी त्यानंतर शिक्षणामुळे वेगवेगळ्या महाविद्यालयांत दाखल झाले. मग निरनिराळ्या क्षेत्रांत नोकरी-व्यवसायात रमले; परंतु एकमेकांना दुरावले नाहीत. एरवी यांच्या गाठीभेटी नित्याच्याच असल्या, तरी कुणा एकाकडेही लग्नकार्य निघालं, की हे सगळेच्या सगळे पाच-सहा दिवस आधीपासून लग्नघरी जमून जबाबदाऱ्या पार पाडतात. सुखाच्या किंवा कठीण प्रसंगातही हे सारे एकजीव होऊन गेलेले असतात. 

डॉ. बोरसे म्हणाले, ‘‘आमचं अभिन्नत्व जाणून ते जपणारे कुटुंबीय आम्हाला लाभले. आई-बाबा, भावंडं, पत्नी, मुलं आणि नातवंडंही आम्हा सात जणांभोवती जोडली जात राहिली. आमच्या सहचारिणींचा स्वतंत्र व्हॉट्‌सॲप ग्रुप आहे. त्यांच्या भेटीगाठी आमच्यासोबत व आमच्याशिवायही चाललेल्या असतात. आमच्यापैकी प्रत्येकाला बाकीच्यांची बित्तंबातमी असते.

मजेमजेत ३३ वर्षांपूर्वी अचानक कुणाला तरी सुचलं, की आपल्या या मैत्रीचा वाढदिवस साजरा करूया. त्या वेळी आमच्यातल्याच एकाच्या वाढदिवसाचं निमित्त होऊन ३१ डिसेंबर हा दिवस ठरला. हा दिवस केवळ एक प्रतीक आहे. प्रत्यक्षात आमचं नातं हे जगण्याला बळ देणारा अखंड वाहता झरा आहे.’

Web Title: Friendship