

मार्केट यार्ड, ता. १५ : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने फळे, भाजीपाला, अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या भावांत पुढील काही दिवसांत वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या ग्राहकांवर आणखी आर्थिक ताण पडणार असून, घरगुती गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांहून अधिक वाढ झाली. राज्यासह परराज्यातून बाजारपेठेत येणाऱ्या शेतीमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात डिझेलवर अवलंबून असल्याने या दरवाढीचा परिणाम थेट वाहतूक भाड्यावर होणार आहे. परिणामी, घाऊक बाजारातील वाढलेले दर किरकोळ बाजारातही दिसून येणार असून, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
मार्केट यार्डात येणाऱ्या फळे, भाजीपाला आणि कडधान्याच्या मालाची वाहतूक खर्चिक होणार असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित बदलणार आहे. माल बाजारातून दुकानांपर्यंत पोहोचविण्याचा खर्च वाढणार असल्यामुळे किरकोळ विक्रेतेही दरवाढ करणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजपासूनच ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागू शकते. दरम्यान, वाढत्या इंधन दराचा फटका केवळ ग्राहकांनाच नव्हे तर शेतकरी, व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनाही बसणार आहे.
विविध राज्यातून फळे, भाजीपाला येतो
मार्केट यार्डात विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला-फळांची आवक होत असते. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची बाजारात दाखल होते. कर्नाटकातून भुईमूग शेंग, कोबी आणि घेवडा येतो. मध्य प्रदेशातील इंदूर भागातून गाजर, तसेच लसूण बाजारात येतो. असे विविध राज्यांतून भाजीपाला-फळे, गहू, तांदूळ आणि इतर भुसार माल मार्केट यार्डात दाखल होत असतो. त्यामुळे इंधन दरवाढीनंतर या राज्यांतून येणाऱ्या मालाच्या वाहतूक खर्चात वाढ होणार आहे.
इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी-व्यापाऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढेल. त्याचा परिणाम थेट भाजीपाला-फळांच्या बाजारभावावर होणार असून, येत्या काही दिवसांत दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
- विलास भुजबळ, ज्येष्ठ अडते, मार्केट यार्ड
मार्केट यार्डातील भुसार विभागात राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात माल येतो. इंधन दरवाढीनंतर वाहतूक भाड्यात वाढ अटळ आहे. वाहतूक खर्च जितका वाढेल, त्यानुसार कडधान्य आणि भुसार मालाचे दरही वाढतील. त्यामुळे व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे.
- डॉ. राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फाम महाराष्ट्र
इंधन दरवाढीमुळे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळातही इंधन दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.