बारामती नगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले

मिलिंद संगई
बुधवार, 13 जून 2018

बारामती :  बारामती नगरपालिकेत आज एका नगरसेवकाने चुकीचे शब्द वापरत मुख्याधिका-यांशी संवाद साधल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. या मुळे आज दुपारनंतर नगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले होते. 

बारामती :  बारामती नगरपालिकेत आज एका नगरसेवकाने चुकीचे शब्द वापरत मुख्याधिका-यांशी संवाद साधल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. या मुळे आज दुपारनंतर नगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले होते. 

एक अतिक्रमण काढण्याच्या विषयावरुन सुरु झालेल्या या प्रकरणाचे जोरदार पडसाद आज उमटले. नगरसेवक समीर चव्हाण यांनी शहरातील एका अतिक्रमण काढण्याबाबत मुख्याधिका-यांच्या भूमिकेबाबत जाब विचारला, तेव्हा मुख्याधिकारी योगेश कडुसकर व समीर चव्हाण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, असे सूत्रांनी सांगितले. यात चव्हाण यांनी कडुसकर यांना एकाच अतिक्रमणाबाबत इतक्या तत्परतेने कारवाई का, इतर ठिकाणी नगरपालिका कारवाई का करत नाही अशी विचारणा केल्यानंतर मुख्याधिकारी व चव्हाण यांच्यात वाद झाला, हा वाद विकोपाला गेल्यावर मुख्याधिका-यांनी तेथून जाणे पसंत केले. निघून जाताना मुख्याधिका-यांच्या डोळ्यात अश्रू होते असे काहींनी सांगितले. 

या संदर्भात मुख्याधिका-यांना त्यांची बाजू समजून घेण्याबाबत वारंवार संपर्क साधूनही त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. समीर चव्हाण यांनी नगरसेवक म्हणून मुख्याधिका-यांना एखाद्या कृतीबाबत विचारणा करणे हा अधिकार आहे, आपण कोणतीही अर्वाच्य भाषा वापरली नाही, मात्र अतिक्रमणाबाबत एकाच ठिकाणी कारवाई करायची व इतर ठिकाणी डोळेझाक करायची ही भूमिका योग्य नाही जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही भांडतो आहोत, असे ते म्हणाले. 

दरम्यान मुख्याधिकारी नगरपालिकेतून निघून गेल्याच समजताच नगरपालिका कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरु करत मुख्याधिका-यांना पाठिंबा दर्शविला. दरम्यान नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी कर्मचा-यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरिही कर्मचा-यांनी नगरपालिकेच्या दारात ठिय्या मांडला होता. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी यात प्रकरणी मध्यस्थीचा प्रयत्न सुरु ठेवला होता. 

Web Title: The functioning of Baramati Municipality was disrupted