सोशल मीडियावर गांधी कुटुंबीयांची बदनामी; समाज कंटकांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

'आघाडी बिघाडी' या फेसबुक अकाऊंटवर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या छायाचित्रांमध्ये फोटोशॉपद्वारे छेडछाड करुन 20 जुलै रोजी ही छायाचित्रे फेसबुकवर अपलोड करण्यात आली. केवळ तेवढ्यावर न थांबता संबंधीत फोटो फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांमध्येही प्रसारीत केली.

पुणे : काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करुन गांधी कुटुंबीयांची फेसबुकद्वारे बदनामी केली जात आहे. 'आघाडी बिघाडी' या फेसबुक अकाऊंटवरुन हा प्रकार सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी शहर काँंग्रेसतर्फे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली. 

'आघाडी बिघाडी' या फेसबुक अकाऊंटवर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या छायाचित्रांमध्ये फोटोशॉपद्वारे छेडछाड करुन 20 जुलै रोजी ही छायाचित्रे फेसबुकवर अपलोड करण्यात आली. केवळ तेवढ्यावर न थांबता संबंधीत फोटो फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांमध्येही प्रसारीत केली. गांधी घराण्याबाबत संबंधीत व्यक्तींना रोष असून त्यातुनच ते त्यांची बदनामी करण्याचा प्रकार करीत आहेत. हा प्रकार करणाऱ्यांविरुद्ध माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा शहर जिल्हा काँंग्रेस कमिटीच्यावतीने शहरामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे. 

जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची भेट घेऊन संबंधीत फेसबुक पेजवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, प्रा.वाल्मिकी जगताप, गुलामहुसेन खान आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gandhi family defamation on Social media Demand for action