गणेश जन्मसोहळा आनंदोत्सवात साजरा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - आकर्षक पुष्परचना, वैशिष्ट्यपूर्ण आरास व विद्युत रोषणाईने सजलेली मंदिरे... शहरात सर्वत्र पहाटेपासूनच घुमणारे गणरायाची गीते... भक्तिपूर्ण वातावरणात लागलेल्या भाविकांच्या रांगा... एकीकडे पारंपरिक पद्धतीचा पाळणा म्हणत, तर दुसरीकडे "हॅपी बर्थडे बाप्पा' म्हणत केक कापून मंगळवारी गणेश जन्मसोहळा मोठ्या आनंदोत्साहात साजरा करण्यात आला. 

कसबा गणपती, तांबडी जोगेश्‍वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती व केसरीवाडा गणपती या मानाच्या गणपतींसह सारसबाग, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसारख्या प्रमुख मंडळांनी गणेश जन्मसोहळ्याचे आयोजन केले होते. याबरोबरच शहराच्या मध्यवस्ती व उपनगरांमधील गणेशोत्सव मंडळांनीही जय्यत तयारी केली होती. गणेश मंदिरांमध्ये पहाटे होमहवन, याग, आरती व अन्य धार्मिक विधी करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास महिलांनी पाळणा म्हणून गणेशजन्म सोहळा साजरा केला. त्यानंतर भाविकांना सुंठवडा, पेढे, बुंदी व राजगिऱ्याचे लाडू, शिरा असा प्रसाद दिला. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश ठिकाणी इच्छुकांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. सायंकाळी सातनंतर मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढली. औंधमधील एसएमएस ग्रुपच्या सोनल व विनया सराफ यांनी केक कापून बाप्पांची जयंती साजरी केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ट्रस्टने गणेश जयंतीचे औचित्य साधत तयार केलेल्या बोधचिन्हाचे गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान, पहाटे पौडवाल यांनी स्वराभिषेक केला. विशाल व सोनाली ढणाल या नवदांपत्याच्या हस्ते महाभिषेक झाला. संकेतस्थळावरून अडीच लाख भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले. सायंकाळी "श्रीं'ची पालखीतून नगरप्रदक्षिणा झाली. 

Web Title: Ganesh janmasohala