कायदा हातात घेणाऱ्यांनी जोडले हात

ganesh mandal Challenging for police notice
ganesh mandal Challenging for police notice

पुणे : ध्वनिप्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये, याबाबत गणेशोत्सव मंडळांना नोटिसा बजावणाऱ्या पोलिसांना 'देखते है किसमे कितना है दम, आता राडा होणार' असे आव्हान देणाऱ्या घोरपडीतील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. आव्हान अंगलट आल्यानंतर मध्यस्थांमार्फत पोलिसांशी दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. असा आगाऊपणा पुन्हा करणार नाही, असे आश्‍वासन मिळाल्यानंतर आठ तासांनी पोलिसांनी त्यांची सुटका केली. मुंढवा पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन न करण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या होत्या. 

मात्र घोरपडी गावाच्या हद्दीतील राज मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ/नटराज मित्र मंडळ, विशाल गजानन मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ, उमेश मित्र मंडळ, साई मित्र मंडळ, गजराज मित्र मंडळ, शिव मित्र मंडळ, सुवर्ण मित्र मंडळ या मंडळांच्या नावाचा उल्लेख असलेला एक व्हॉट्‌सॲप मेसेज बुधवारी व्हायरल झाला. यामध्ये 'घोरपडीगाव भव्य मिरवणूक', 'याला म्हणतात घोरपडीगावचा राडा', 'देखते है किसमे है कितना दम', 'आता राडा होणार' अशा शब्दांत पोलिसांना आव्हान देण्यात आले होते. संबंधित मेसेजमध्ये अंबिका डिजिटल, त्रिमूर्ती डिजिटल, सनयोग डिजिटल, एम. व्ही. नाईन, रणजित ऑडिओ, ओमकार डिजिटल यांसारख्या साउंड सिस्टीमची नावे पोलिसांच्या निदर्शनास आली. 

या प्रकरणावरून पोलिसांनी दीपक वाघमारे, पंकज परदेशी, मुकेश पाटे, राज राजपूत, आकाश पुजारी, केविन  यांच्यावर कारवाई केली. तर महापालिका व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या घोरपडी गावातील श्रावस्ती मंडळाचा मंडप महापालिकेने बुधवारी रात्री काढून टाकला. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष कांगाळे व कार्याध्यक्ष विनोद गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ध्वनिप्रदूषण नियमाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी मंडळांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र काही मंडळांच्या मेसेजद्वारे ते कायद्याला जुमानत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी साडेपाचला त्यांना अटक केली. त्यानंतर आपण चूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे रात्री दीडला त्यांना सोडले. मात्र काही जणांना गणेशोत्सव काळात अतिरिक्त पोलिस आयुक्तांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 
- अनिल पाथरुडकर, पोलिस निरीक्षक, मुंढवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com