सामूहिक विवाह सोहळ्यासाठी गणेश मंडळांचाही पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

ग्रामीण भागातही अन्य ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे घेण्यात येत आहेत. ज्या धर्मादाय संस्था आणि देवस्थानांना विवाह सोहळा घेणे शक्‍य नाही, अशा काही संस्थांनी निधीचे धनादेश सामूहिक विवाह सोहळा समितीला दिले आहेत. 

पुणे : विधायक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी एकत्रित येत सर्व जाती-धर्मीयांच्या आणि शेतकरी, गरीब घटकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने काही गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. 

शेतकरी आणि विविध जाती-धर्मांतील गरीब, गरजूंना विवाह सोहळ्यावर होणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागते. ही बाब लक्षात घेऊन धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील धर्मादाय संस्थांना गरीब घटकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, जेजुरीसह विविध संस्था आणि देवस्थानांनी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले.

ग्रामीण भागातही अन्य ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे घेण्यात येत आहेत. ज्या धर्मादाय संस्था आणि देवस्थानांना विवाह सोहळा घेणे शक्‍य नाही, अशा काही संस्थांनी निधीचे धनादेश सामूहिक विवाह सोहळा समितीला दिले आहेत. 

शहरातील गणेश मंडळांना सहभागी करून नोव्हेंबर महिन्यात सामूहिक विवाह सोहळा घेण्याचे नियोजन आहे. सर्वधर्मीयांच्या प्रमुखांना भेटून त्यांना गरीब-गरजू लोकांची नावे देण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवाच्या 125व्या वर्षानिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम सुरू करण्यात येईल. शहरातील बहुतांश गणेश मंडळे या उपक्रमात सहभागी होणार आहेत. विविध जाती-धर्मांच्या वधू-वरांचा विवाह त्यांच्या रीती-रिवाजानुसार करण्यात येईल. 

- महेश सूर्यवंशी, विश्‍वस्त, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट 
 

Web Title: Ganesh Mandals takes Initiatives for Group Weddings