Ganesh Visarjan 2022 : निर्बंधमुक्त आणि स्वैर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Ganesh Visarjan 2022

Ganesh Visarjan 2022 : निर्बंधमुक्त आणि स्वैर

पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक दीर्घकाळ चालली हा मुळात प्रश्न नाही. दोन दिवस चाललेल्या या मिरवणुकीत आपण काय संदेश दिला हा खरा प्रश्न आहे. ज्यांच्यासाठी मिरवणूक काढली जाते तो गणेशभक्त नेमका कोठे होता? पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली इतिहास आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा विसर्जन मिरवणूक हा परमोच्च बिंदू मानला जातो. दोन वर्ष कोरोनाच्या भयंकर संकटाचा सामना करून यावर्षी हा उत्सव खऱ्या अर्थाने निर्बंध मुक्त होता.

राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत आलेली नकारात्मकता दूर व्हावी म्हणून या उत्सवाला नियमांचे बंधन येणार नाही याची काळजी घेतली. मात्र निर्बंध मुक्तीचा काहीसा चुकीचा अर्थ प्रशासन आणि मंडळे या दोन्ही पातळीवर घेण्यात आला. त्यामुळेच पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक भलतीच लांबली. मुळात मानाच्या गणपतीच्या मंडळांच्या मिरवणुकीला लागलेला वेळ लक्षणीय आहे. अकरा तास फक्त पाच गणपतीसाठी आणि इतर दीड पावणेदोन हजार मंडळांनी उरलेल्या दहा-बारा तासांमध्ये मिरवणूक संपवावी, ही अपेक्षा चुकीची आहे.

विसर्जन मिरवणुकीला शिस्त असावी, ती वेळेत संपवावी या विषयावर दरवर्षी चावून चोथा होतो, पण त्यात फारसा काही बदल होत नाही. त्यामुळे मिरवणूक हवी तशी काढा पण लोकांना ती नीट पाहता आली पाहिजे, त्याचा आनंद घेता यायला हवा, संपूर्ण कुटुंबाला त्यात सहभागी होता यायला हवे. ही मिरवणूक पाहण्यासाठी खास परदेशी पर्यटक यायला हवेत, ते आले तर त्यांना मिरवणूक नीट दिसायला हवी. दुर्दैवाने तसे होत नाही. मिरवणुकीचे व्यापक स्वरूप, त्यातील सर्वसमावेशकता दिवसेंदिवस आक्रसली जात आहे.

मिरवणूक फक्त ढोल ताशा पथकांसाठी आहे, अशी अवस्था आहे. मानाच्या गणपतीसमोर सात-आठ पथके, त्यात तीनशे ते पाचशे ढोल सहभागी होतात. दोरखंड टाकून ही पथके संपूर्ण रस्ता अडवतात. ज्यांना त्यांचे वादन पाहायचे आहे, त्यांना दोन्ही बाजूला उभे राहण्यासही जागा नसते, त्यांनी कितीवेळ वाजवावे यालाही बंधन नसते. या पथकांच्या स्वयंसेवकांकडून नागरिकांना केली जाणारी धक्काबुक्की असह्य असते. मग जर तुमचं वादन पाहण्यासाठी आलेल्यांचीच तुम्हाला कदर नसेल तर मग नदीपात्रातच ढोल वाजवलेले चांगले.

पोलिस दोन मंडळांमध्ये अंतर राहणार नाही याची काळजी घेतात, मात्र यावर्षी सुरवातीपासून हे चित्र दिसले नाहीत. काही मंडळांचा अपवाद वगळता ढोल ताशांच्या दणदणाशिवाय फारसे नावीन्य किंवा प्रयोगशीलता जाणवली नाही. रात्र झाली की, डीजेच्या भिंती आणि त्यावर केला जाणारा यथेच्छ नाच हे टिळक रोड, कुमठेकर रोडवरील मिरवणुकीचे वैशिष्ट्य बनले आहे. पण कर्णकर्कश्श आवाजावर तरुणाईला नाचवून आपण काय साध्य करतोय याचाही विचार व्हायला हवा. अनेक जण लहान मुले घेऊन मोठ्या हौसेने मिरवणूक पाहायला येतात, पण धडकी भरवणारे आवाज आणि अंगविक्षेपाचा डान्स यांचा भ्रमनिरास करतात. यंदा सर्वच चौकातील ध्वनिप्रदूषण पातळी पाचपट वाढली आहे. गणेश विसर्जनासाठी आपण गर्दी खेचू पण या गर्दीला तुम्ही काय संदेश देता. मग आमची मिरवणूक 'लय भारी' कशाचा आधारावर म्हणायची. यंदाच्या मिरवणुकीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्याची उत्तर वेळीच शोधली नाहीत तर मिरवणूक उत्सवाचा, आनंदाचा समाजाला एकत्र बांधणारा न उतरता कटकटीचा आणि त्रासाचा होण्यास वेळ लागणार नाही.

या प्रश्नांची उत्तरे मिळतील का?

- ढोल-ताशा पथकांच्या संख्येवर मर्यादा हवी का.

- मानाच्या गणपतींना वेळेचे बंधन हवे का

- मिरवणूक पाहायला येणाऱ्यांना ती नीट पाहण्याची व्यवस्था

- पोलिसांकडून गर्दीचे योग्य व्यवस्थापन

Web Title: Ganesh Visarjan 2022 Pune Ganesh Festival Idol Procession

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..