साडेतीन तासांत रस्ते चकाचक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

मिरवणुका संपताच  स्वच्छता मोहीम
विविध भागांतील विसर्जन मिरवणुका संपताच, विसर्जन मार्ग स्वच्छ करण्याची महापालिकेची मोहीम यंदाही यशस्वी झाली असून, त्यात शुक्रवारी दुपारपर्यंत सुमारे ८ लाख ८३ हजार किलो निर्माल्य जमा करण्यात आल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने दिली.

पुणे - शहरात ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीने वेग घेतला असतानाच पुणेकरांनी नदीऐवजी हौद, पाण्याच्या टाक्‍यांत बाप्पाचे विसर्जन करून या मोहिमेला हातभार लावला. पुणेकरांनी यंदा सव्वापाच लाख गणेशमूर्तींचे विसर्जन केले असून, त्यातील अडीच लाख मूर्तींचे हौद, टाक्‍यांमध्ये विसर्जन झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, विसर्जन मिरवणुकीनंतर शहर साडेतीन तासांत चकाचक करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. पुणे शहर चकाचक ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

गणेशोत्सवातही सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होणार नाही, याकडे महापौर मुक्ता टिळक यांच्यासह महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी लक्ष दिले होते. याकाळात नियमित साफसफाई करण्यावर महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने भर दिला होता. बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन करून स्वच्छतेच्या अभियानाला पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार नदीऐवजी हौद, पाण्याच्या टाक्‍या, घरच्याघरी विसर्जन करण्यासोबतच मूर्ती दान करावी, असे आवाहनही करण्यात आले होते; त्याला पुणेकरांनी प्रसिसाद दिला.

मूर्ती विसर्जन
हौद, टाक्‍यांत २ लाख ५९ हजार
नदी, कालव्यांत २ लाख ७० हजार
मूर्तिदान ४ हजार २९
निर्माल्य जमा सुमारे ९ लाख किलो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Nirmalya Cleaning