तीन दिवसांनंतरही कार्यकर्त्यांचा जाईना ‘शिणवटा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

कारवाईची मागणी
रस्त्यावर उभारलेले मोठे मंडप, कमानी, देखावा अद्याप मंडळांनी काढला नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मोजक्‍याच मंडळांनी स्टेज हलविले आहेत; तर काही ठिकाणी पत्रे, बांबू पदपथावरच पडून आहेत. महापालिकेने अशा मंडळांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिंपरी  - गणरायाची आरास व मिरवणुकांच्या तयारीत कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. गुरुवारी (ता. १२) बाप्पाचे विसर्जन केले. मात्र, विसर्जनानंतर तीन दिवस उलटूनही शहरातील मंडप, कमानी आणि देखावे ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. मंडपवाल्यांचे भाडे न दिल्याने त्यांनी तसेच ठेवल्याचे समजते.  

शहरातील विविध भागांत गणरायाचे अकरा दिवस जोरदार स्वागत झाले. मात्र, मंडळांनी उभारलेले मंडप व कमानीच्या कोंडीतून भाविकांना अकरा दिवसांनंतरही दिलासा मिळालेला नाही. कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, चिखली, पिंपरी, चिंचवड, दापोडी, फुगेवाडी, नेहरूनगर आदी ठिकाणचे मंडप अद्यापही रस्त्यावरच आहेत. पाच किंवा दहा वर्षांसाठी करार करून लहान व मोठ्या मंडळांनी मंडपाचे भाडे ठरविलेले असते. मात्र, दर पाच किंवा दहा वर्षांनी मंडळांना दहा टक्के रक्कम मंडप कारागिरांना वाढवून द्यावी लागते. तसेच, जीएसटी भरावा लागतो. परंतु, यंदा वर्गणी कमी झाल्याने मंडळांचे नियोजन कोलमडले आहे. 

मोठ्या मंडपबांधणीसाठी ७० हजार, तर छोट्या मंडपासाठी सुमारे २० ते २५ हजार रुपये भाडे आहे. यंदा वर्गणी जमा न झाल्याने हे भाडे मंडळांना आवाक्‍याबाहेर गेले आहे. त्यामुळे मंडप रस्त्यावरच उभे आहेत, असे कळते. उत्सवासाठी मंडळांना पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, मंडप काढणीसाठी कोणतीही नियमावली व ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. ठरावीक मंडळांवर गुन्हे दाखल होतात. पण, त्याकडे काणाडोळा केला जातो.

विसर्जनानंतर मंडळांचे डेकोरेशन व इतर साहित्य मंडपातच असते. ते काढल्याशिवाय कारागिरांनाही मंडप काढता येत नाही. दहा दिवस थकल्यामुळे कार्यकर्तेही मंडपाकडे लक्ष देत नाहीत. याशिवाय, महापालिकाही त्याकडे दुर्लक्ष करते. मंडपासाठी खासगी जागेचा पालिकेकडून परवाना आवश्‍यक असतो. महापालिका मंडळाकडून प्रत्येक एक फुटासाठी २४ रुपये व जीएसटी मिळून २८ रुपयांपर्यंत शुल्क घेते. असे ३० ते ४० फुटांपर्यंत मंडप असतात. तसेच, वाहतुकीची सोय करावी लागते, असे थेरगाव मंडळाचे कार्यकर्ते नीलेश पिंगळे यांनी सांगितले.

गणेशोत्सव संपला, की सर्वांनी मंडप हटवायला हवेत. ही प्रत्येक मंडळाची वैयक्तिक जबाबदारी आहे. जेवढे दिवस परवानगी दिली आहे, तेवढेच दिवस सर्वांनी मंडप ठेवायला हवा; अन्यथा कारवाई करण्यात येईल.  
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav Decoration Road Traffic