esakal | पुणे जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करणार असाल, तर पोलिस अधीक्षकांच्या या सूचना वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करणार असाल, तर पोलिस अधीक्षकांच्या या सूचना वाचा

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवार (ता. २२) पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे.

पुणे जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करणार असाल, तर पोलिस अधीक्षकांच्या या सूचना वाचा

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणपतीची मूर्ती चार फुटांची, तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपेक्षा जास्त उंच नसावी, आगमन व विसर्जण मिरवणुका काढु नयेत, आरतीसाठी पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच, गणेशोत्सवादरम्यान जिलह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे पाळावे, असे आवाहन जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तर, दुसरीकडे पोलिसांच्या सूचना डावलून जिल्ह्यातील एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगमन अथवा विसर्जण मिरवणुका काढण्याचा प्रयत्न केल्यास अथवा आरतीसाठी पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र जमल्याचे लक्षात आल्यास, संबधित मंडळांच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवार (ता. २२) पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, पाटील यांनी हे आवाहन केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत अधिक बोलतांना पाटील म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न चालू असले, तरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. यामुळे चालू वर्षी गणेशोत्सव शांततेत व अगदी साधेपणाने करण्याच्या सूचना गृहविभागाने केलेल्या आहेत. गृहविभागाने दिलेल्या सचनेनुसार, चालू वर्षी सार्वजनिक मंडळांना मंडप घालता येणार आहे. सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना मंदिरात करावी अथवा मंदिर नसेल तर शाळा, व्यायामशाळेत करण्यास हरकत नाही. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी दीडशेहून अधिक पोलिस अधिकारी व दोन हजार सातशे पोलिस कर्मचारी डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उतरणार आहेत. तर पोलिसांच्या मदतीला बाराशे होमगार्ड असणार आहेत. नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची गरज आहे. 

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे-  

 • श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फुट व घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादेत असावी.
 • पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे.
 • गणेशमूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे.
 • उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, यांची काटेकोरपणे नोंद घ्यावी. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास विशेष पसंती देण्यात यावी. 
 • आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
 • सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबिरे, रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगी इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
 • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाइन केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात यावेत.
 • गणपती मंडपामध्ये  निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविंकासाठी शारीरिक अंतराचे तसेच, स्वच्छतेचे नियम (मास्क,सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे  विशेष लक्ष देण्यात यावे.
 • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
 • लहान मुले आणि वरिष्ठ  नागरिकांनी सुरक्षेतेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
 • संपूर्ण चाळीतील/ईमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्ती विसर्जनासाठी एकत्रितरीत्या येऊ नयेत.
 • कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन,आरोग्य ,पर्यावरण ,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
 1. गणेशोत्सव - शनिवार (ता. २२) - गणेश चतुर्थी  (श्री गणेशाची प्रतिष्ठापना)
 2. रविवार (ता. २३) - दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
 3. मंगळवार (ता. २५) - गौरी आगमन
 4. बुधवार (ता. २६) - पाच दिवसाचे गणपतींचे विसर्जन
 5. शुक्रवार (ता. २८) - सातव दिवस गणपतींचे विसर्जन
 6. मंगळवार (ता. १) - अनंत चतुर्दशी, गणपतींचे विसर्जन
loading image
go to top