बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी जेरबंद 

अनिल सावळे 
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

आयटी हबमध्ये भाडेतत्त्वावर जागा घ्यायची. तेथे संगणक, एचआर, सेल्स मॅनेजर असा सेटअप उभा करायचा. तेथील कॉर्पोरेट कल्चर पाहून कोणालाही शंका येत नसे. त्यानंतर प्लेसमेंटच्या नावाखाली तरुणांकडून लाखो रुपये उकळून तिघेजण पुरावा न ठेवता पसार व्हायचे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना तिघांपैकी एकाची मैत्रीण नोकरीच्या शोधात असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी एका आयटी कंपनीच्या मदतीने तिला मुलाखतीला बोलावून चौकशी केली. तिने माहिती देताच वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने या "स्पेशल 26' टोळीतील तिघांना जेरबंद केले. 

नेव्ही एंटरप्रायजेस आयटी कंपनीने 2015 च्या मार्चमध्ये "पुणे डॉट क्‍लिक डॉट इन' संकेतस्थळावर सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी जाहिरात दिली होती. त्यावर कंपनीचे डिटेल्स दिले होते. निखिल नावाच्या आयटी इंजिनिअरने चौकशी केल्यानंतर कंपनीने दोन एप्रिल रोजी मुलाखतीसाठी ई-मेल पाठविला. येरवडा परिसरातील कॉमरझोन इमारतीमधील द आयप्लेक्‍स बिल्डिंगमध्ये कंपनीने मुलाखत ठेवली होती. तेथे अन्य काही उमेदवारही मुलाखतीसाठी आले होते. तेथील एचआर संजीवकुमार भगत आणि आंचल सिंग यांनी मुलाखती घेतल्या. कंपनीचे सिनिअर सेल्स मॅनेजर राहुल गुप्ता यांनी कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी 50 हजार रुपये रोख भरावे लागतील; तसेच ही रक्‍कम एक वर्षानंतर परत मिळेल, असे सांगण्यात आले. त्यावर विश्‍वास ठेवत पैसे भरून तो कामावर रुजू झाला. त्याच्यासोबत सायली आणि ईशा या दोघी इंजिनिअर तरुणींही कंपनीत रुजू झाल्या. सेल्स मॅनेजरने कंपनीच्या सेक्‍युरिटी गार्ड कृष्णा जयस्वाल याच्याकडे पैसे भरण्यास सांगितले होते. त्यानुसार कोणी 50 हजार, कोणी 70 हजार, तर काहींनी एक लाख रुपये भरले. त्याच दिवसापासून ट्रेनिंग सुरू झाले. त्यांच्यापूर्वी पन्नासहून अधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर तेथे प्रशिक्षण घेत होते. त्यांनी 30 जणांची एक बॅच केली होती. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एचआर, सेल्स मॅनेजर नोकरीस घेतले होते. दहा दिवसांपर्यंत ट्रेनिंग नियमित सुरू होते. एचआर आंचल सिंग यांनी कंपनीला 17 एप्रिल रोजी सुटी असल्याचे एक दिवस अगोदर मोबाईलवर सर्वांना कळविले. त्याच दिवशी कंपनीचे संकेतस्थळ बंद झाले. निखिलसह काही तरुणांनी कंपनीच्या नागपूर शाखेत चौकशी केली. परंतु ती शाखा बंद पडल्याचे समजले. एचआर, सेल्स मॅनेजर, कंट्री हेड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागत होते. कॉमरझोनमध्ये सेक्‍युरिटी गार्डकडे चौकशी केली असता, कंपनीने गाशा गुंडाळल्याचे सांगितले. निखिल आणि रणधीरकुमार या दोघांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. नोकरीचे आमिष दाखवून 50 ते 60 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना लाखो रुपयांना गंडा घालून कंपनीचे तोतया अधिकारी फरार झाले होते. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील आणि त्यांच्या पथकाने सुरू केला. सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह विष्णू सरोदे, मोहन वाळके, किसन भारमल, अजीज बेग, मांजरे, कुदळे या कर्मचाऱ्यांची टीम आरोपींच्या शोधात होती. त्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु आरोपींनी त्यांचे चेहरे आणि माहिती कोणाला मिळणार नाही, याबाबत खबरदारी घेतली होती. आरोपी बनावट नावाने तेथे काम करीत होते. त्यांचे मोबाईलही बंद होते. मुलाखतीसाठी ज्या ठिकाणी जागा भाडेतत्त्वावर घेतल्या अशा सर्व ठिकाणांची चौकशी केली. त्यांना आयडी कार्ड अथवा काही पुरावा दिलेला आहे का, याची माहिती घेतली. त्यांनी कोठे बॅंकेत व्यवहार केलेले आहेत का, हे तपासले. परंतु पोलिसांना काही ठोस पुरावे मिळत नव्हते. तपासात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांना क्‍ल्यू मिळाला. आरोपी पंकज चौधरी याची मैत्रीण आयटी कंपनीत नोकरीसाठी एका प्लेसमेंट कंपनीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एका आयटी कंपनीच्या मॅनेजरला गाठले. पंकजच्या मैत्रिणीला मुलाखतीसाठी बोलावून घेतले. तेथे महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली. त्या वेळी तिने पंकज भेकराईनगर परिसरात राहत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी नीरज प्रकाश मोटवानी ऊर्फ पंकज चौधरी, जतीनकुमार लायकसिंग ऊर्फ ओंकार मोहिते आणि अमित हनुमंत माने ऊर्फ राहुल गुप्ता या आरोपींना 26 जून 2015 रोजी अटक केली. त्यांच्याकडून रोकड, बनावट आयडी, ऑफर लेटर आदी साहित्य जप्त केले. 

Web Title: gang arrested