बारामतीत भुरट्या चोऱ्या करणारी टोळी जेरबंद 

कल्याण पाचांगणे
Friday, 16 October 2020

शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेढ्या, बोकडे, तसेच सोनसाकळी, मोटार गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणारी टोळीच पोलिसांनी पकडली.

माळेगाव : बारामती तालुका पोलिस ठाणे व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन अंतर्गंत भुरट्या चोऱ्यांचा बिमोड करण्यासाठी अलीकडच्या काळात पोलिसांनी ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवली होती. त्या शोध मोहिमेला यश आले असून, शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेढ्या, बोकडे, तसेच सोनसाकळी, मोटार गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणारी टोळीच पोलिसांनी पकडली. ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे, अशी माहिती आज पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, बारामती तालुक्यातील खांडज, शिरवली, सांगवी, माळेगाव, नीरावागज, कऱ्हावागज, मेखळी, २२ फटा,  काळा वडा आदी भागात शेळ्या मेंढ्या आणि बोकडे चोरीचे प्रकार वाढले होते. तशीच काहीशी समस्या वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पणदरे, लाटे, माळवाडी, खुंटे, कांबळेश्वर, लकडेवस्ती ढाकाळे, होळ, कोऱ्हाळे आदी गावांमध्ये वाढली होती. परिणामी अर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकरी व शेतमजूरांचा प्रपंच मेटाकुटीला आला होता. अर्थात संबंधित लोकांच्या वाढत्या तक्रारींची दखल थेट पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी घेतली आणि या भुरट्या चोऱ्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्या प्रक्रियेला नुकतेच चांगलेच यश आले असून गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश लंगुटे यांनी खांडज गावातील चार आरोपींना मुद्देमालासह पकडले.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आरोपींमध्ये अजय अनिल जाधव, सिताराम अंकुश भंडलकर, किरण दामोदर हरिहर, भरत उर्फ तानाजी बोडरे (सर्व रा.खांडज) यांचा समावेश आहे. विशेषतः सदरच्या आरोपींनी आजवर विविध भागातून ८० ते ८५ शेळ्या, मेंढ्या व बोकडे चोरल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.

तसेच सदरच्या पथकाने बारामती एमआयडीसी भागात बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघा आरोपींना मुद्देमालासह अटक केली. त्यामध्ये हृतीक महेंद्र शिंदे, रोहन उर्फ काळ्या आविदास माने ( दोघे, रा. तांदूळवाडी) या आरोपींचा समावेश आहे. संबंधितांकडून विविध कंपन्यांच्या पाच बॅटऱ्या पोलिस तपासात हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

सदरची कामगिरी यशस्वी केल्याबद्दल उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी गुन्हे शोध पथकातील साहय्यक पोलिस निरिक्षक योगेश लंगुटे, साहाय्यक फौजदार दिलीप सोनवणे, पोलिस नाईक सदाशिव बंडगर, काॅन्स्टेबल विनोंद लोखंडे, नंदू जाधव, मंगेश काळे, संतोष मखरे, प्रशांत राऊत यांचे अभिनंदन केले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gang of thieves was arrested in Baramati