पोलिसांच्या रडारवर पुण्यातील टोळ्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा. कोथरूड, सध्या रा. सोनेगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी मंगळवारी (ता. २) रात्री उशिरा जामखेड येथून ताब्यात घेतले. पुढील एक वर्ष त्याला ‘एमपीडीए’ अधिनियमान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

नीलेश घायवळ स्थानबद्ध
लोणी काळभोर - पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा. कोथरूड, सध्या रा. सोनेगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी मंगळवारी (ता. २) रात्री उशिरा जामखेड येथून ताब्यात घेतले. पुढील एक वर्ष त्याला ‘एमपीडीए’ अधिनियमान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. 

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व भिगवण पोलिसांनी ही कारवाई केली. पुण्यातील गॅंगस्टार गजा मारणेवर पोलिसांनी नुकतीच कारवाई केली. त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या गुंड नीलेश घायवळ याच्याही मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊ नये म्हणून त्याला ‘एमपीडीए’ अधिनियमांतर्गत स्थानबद्ध केले आहे. पुढील एक वर्षभर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घायवळ याच्यावर यापूर्वी मोक्का, खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, दंगा करणे, हाणामारी आदी प्रकरणी दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. घायवळ टोळीचे वाढत्या कारवाया लक्षात घेता पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीला हिरवा कंदील दाखवल्याने पोलिसांनी मंगळवारी (ता.२) रात्री उशिरा घायवळ याला जामखेडमधून ताब्यात घेऊन पुण्यात आणले. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. 

पिंगळे वस्ती आग लागल्याने महावितरणच्या केबल जळून खाक 

बंडू आंदेकरसह दोघांना अटक
पुणे - कुडले टोळीचा ओंकार कुडले याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. वर्चस्व लढार्इतून आंदेकर टोळीने २१ फेब्रुवारीला गणेश पेठेतील बांबू आळीमध्ये ओंकारवर घातक शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. 

सूर्यकांत ऊर्फ बंडू राणेजी आंदेकर आणि ऋषभ देवदत्त आंदेकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अशोक वड्ड, स्वराज वाडेकर, आदित्य उकरंडे आणि गाडी गण्या यांचा समावेश आहे.

पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना; बिबवेवाडीत मंडप सजावटीच्या गोदाम भस्मसात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ, बांबू आळी) याने हल्ला प्रकरणात फिर्याद दिली होती. ओंकार आणि आंदेकर टोळी यांच्यात अनेकदा वादावादी झाली आहे. शहराच्या मध्य वस्तीत आंदेकर टोळी सक्रिय आहे. कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचे बंडू आंदेकर याला वाटत होते. त्यातूनच त्याच्या सांगण्यावरून ऋषभ आंदेकर, सूरज ऊर्फ गणेश, गाडी गण्या यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ओंकार याच्यावर पालघन, कोयता अशा धारदार हत्याराने वार करून, त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सतीश गोवेकर व खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बहिरट यांच्या पथकाने बंडू आंदेकर आणि ऋषभला घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गाडे करीत आहेत. या भागातील नागरिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. 

ऐंशीच्या दशकात वर्चस्वाच्या वादातून आंदेकर-माळवदकर टोळीत संघर्ष झाला होता. त्यावेळी झालेल्या खून प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आंदेकर याच्यावर १९८५ पासून खून, खुनाचा प्रयत्न, धमक्‍या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे फरासखाना, खडक व समर्थ पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गेल्या महिन्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर वैमनस्यातून विघ्नेश गोरे या युवकावर आंदेकर टोळीतील सराईतांनी गोळीबार केला होता.

गजा मारणेच्या घरावर नोटीस
पुणे - तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढणारा गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात दाखल गुन्ह्यात नोटीस बजावली आहे. वारजे पोलिसांनी ही नोटीस काढली आहे. चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर व्हावे, अशी नोटीस मारणेसह त्याच्या १० साथीदारांच्या घरांवर चिकटविली आहे.

मिरवणूक प्रकरणी मारणे आणि साथीदारांविरोधात कोथरूड, तळेगाव दाभाडे, वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वारजे ठाण्यात दाखल गुन्ह्यात मारणे आणि साथीदारांना जामीन मिळाला नसून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांच्या घराची तपासणी केली आहे. वारजे ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान या गुन्ह्याच्या तपास सुरू आहे. त्यामुळे मारणेसह १० साथीदारांच्या घरांवर चौकशीला हजर होण्याची नोटीस चिकटविली आहे. पोलिसांनी तेथे पंचनामा केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangs in Pune on police radar