आजोबांची विचारधारा एक; नातवांच्या राजकीय वाटा वेगळ्या!

आजोबांची विचारधारा एक; नातवांच्या राजकीय वाटा वेगळ्या!
Published on: 

स्व. गणपतराव देशमुख
डॉ. बाबासाहेब देशमुख : SGW26B10372
डॉ. अनिकेत देशमुख : SGW26B10373

आजोबांची विचारधारा एक; नातवांच्या राजकीय वाटा वेगळ्या!
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख भाजपप्रणीत आघाडीत, तर डॉ. अनिकेत देशमुख दुसऱ्या पॅनेलमधून मैदानात

दत्तात्रय खंडागळे : सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १८ : राजकारणात विचारधारा, पक्षनिष्ठा आणि राजकीय वारसा यांना महत्त्व असते. सहकार क्षेत्रात मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्रित कामाची अपेक्षा असते. प्रत्यक्ष निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगळेच चित्र दाखवतात. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत याचाच प्रत्यय येत आहे. अकरा वेळा आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांचे दोन नातू दोन वेगवेगळ्या पॅनेलमधून निवडणूक लढवत असल्याने सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात ‘आजोबांची विचारधारा एक; नातवांच्या राजकीय वाटा वेगळ्या!’ अशी चर्चा रंगली आहे.
स्व. गणपतराव देशमुख हे सांगोल्याच्या राजकारणातील स्वतंत्र पर्व होते. एकाच पक्षातून तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. साधी राहणी, अभ्यासपूर्ण भूमिका आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरील ठाम भूमिका यांमुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या याच राजकीय वारशाची चर्चा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनेलमधील १९ पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित जागांसाठी चुरस कायम आहे. सांगोला तालुक्यातील तीन उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यापैकी गणपतराव देशमुख यांचे नातू आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे भाजपप्रणीत आघाडीकडून सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात संजय इंगोले आहेत. तर गणपतरावांचे दुसरे नातू डॉ. अनिकेत देशमुख भटक्या-विमुक्त जाती मतदारसंघातून रिंगणात असून, त्यांच्या विरोधात श्रीधर कोंडले आणि राजेंद्र बंदिछोडे हे उमेदवार आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला. त्या निवडणुकीत दोघेही एकत्र दिसले होते. मात्र, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचे राजकीय मार्ग वेगवेगळ्या पॅनेलमधून जात आहेत.

चौकट...
विधान परिषद निवडणुकीतही वेगळ्या भूमिका
नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही गणपतराव देशमुख यांच्या दोन्ही नातवांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या होत्या. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले होते, तर डॉ. अनिकेत देशमुख यांनी भाजपविरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील त्यांची वेगळी राजकीय वाटचाल ही केवळ या निवडणुकीपुरती मर्यादित नसल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.