शिरूर शहरात कचराकोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

शिरूर - कचरा डेपोतील आगीमुळे धुराचा त्रास सहन करावा लागत असलेल्या येथील हुडको वसाहतीतील संतप्त तरुणांनी डेपोत येणाऱ्या कचरा गाड्या रोखल्या. त्यामुळे आज शहरात दुपारपर्यंत कचराकोंडी निर्माण झाली. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. दुपारनंतर कचरा वाहतूक सुरळीत झाली. 

शिरूर - कचरा डेपोतील आगीमुळे धुराचा त्रास सहन करावा लागत असलेल्या येथील हुडको वसाहतीतील संतप्त तरुणांनी डेपोत येणाऱ्या कचरा गाड्या रोखल्या. त्यामुळे आज शहरात दुपारपर्यंत कचराकोंडी निर्माण झाली. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. दुपारनंतर कचरा वाहतूक सुरळीत झाली. 

हुडको वसाहतीजवळ असलेल्या नगर परिषदेच्या कचरा डेपोत रविवारी (ता. २२) आग लागल्याने हुडकोसह परिसरात धुराचे लोट पसरले. कायमच हा त्रास असल्याने हुडकोतील तरुणांनी ही आग विझवण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे काही काळ तणाव पसरला. याबाबत नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी हुडकोवासीयांशी समोरासमोर चर्चा करावी; अन्यथा उद्यापासून कचरा घेऊन येणारी वाहने अडविण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आज सकाळी प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, शहराध्यक्ष अविनाश घोगरे, शैलेश जाधव, प्रसन्ना भोसले, चेतन तुबाकी, आदेश बारगळ, विलास वीर, परेश सुपते, ऋषिकेश घोगरे, उमेश शेळके, अमित पंडित, शबीब पठाण, ओम ठाकूर, अमर झेंडे आदी कार्यकर्त्यांनी कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी येणारी वाहने रोखण्यास सुरवात केली. कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांची दुपारपर्यंत रांग लागली. 

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे; तसेच पोलिस उपनिरीक्षक बी. बी. पाटील, किरण घोंगडे, बी. जे. पालवे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन कचऱ्याची वाहने घेऊन येणारी वाहने न रोखण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मात्र, कार्यकर्त्यांनी या कचरा डेपोमुळे होणाऱ्या उपद्रवाचा पाढा पोलिसांसमोर वाचला व जोपर्यंत नगर परिषद येथून कचरा डेपो हलवीत नाही; तोपर्यंत कचरा डेपोत कचरा टाकू दिला जाणार नाही, असा इशारा दिला. पोलिसांसह नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी तरुणांशी चर्चा केल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.

नगर परिषदेच्या या कचरा डेपोला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी नाही. नगर परिषद या ठिकाणी बेकायदा कचरा टाकत असून, तो नष्ट करण्यासाठी वारंवार कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे हुडकोसह; बाबूरावनगर, सी. टी. बोरा कॉलेज, डी फार्मसी कॉलेज, कुकडी कॉलनी या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. डेपोतील कचऱ्याला आग लागल्यानंतर पुणे- नगर रस्त्यावर धूर पसरून वाहतूक विस्कळित होते, छोटे-मोठे अपघातही यापूर्वी घडले आहेत.
 - अनिल बांडे, अध्यक्ष, प्रवासी संघ

Web Title: garbage issue