कचरा होण्यापासून शहर वाचवा

पितांबर लोहार
मंगळवार, 18 जून 2019

पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा वल्लभनगर तर, देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील कचरा रुपीनगरलगत टाकला जात आहे. त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. मोशी डेपोला पर्याय म्हणून ताथवडे, पुनावळेतील जागाही विचाराधीन आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे.

पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा वल्लभनगर तर, देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील कचरा रुपीनगरलगत टाकला जात आहे. त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. मोशी डेपोला पर्याय म्हणून ताथवडे, पुनावळेतील जागाही विचाराधीन आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास भविष्यात चारही बाजूंनी शहरावर कचऱ्याचे संकट ओढवू शकते. यामुळे शहराचा कचरा होण्यापासून वाचविण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मोशीतील ८१ एकर जागा कचरा डेपोसाठी राखीव ठेवली आहे. सध्या शहरात दररोज ८५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. ठेकेदार व महापालिकेच्या यंत्रणेद्वारे कचरा संकलन करून डेपोपर्यंत नेला जातो. यात घरोघरच्या कचऱ्यासह हॉटेल, कंपन्या, त्यातील कॅंटीन, गटारे आदी ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे. कचऱ्याचे वाढते प्रमाण व पूर्ण क्षमतेने भरत आलेला डेपो यातून मार्ग काढण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. यात प्लॅस्टिकपासून इंधन, पेव्हिंग ब्लॉक, सेंद्रिय खत, गांडूळ खतनिर्मितीचे प्रयोग सुरू आहेत. शिवाय जैववैद्यकीय कचऱ्याची वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वतःच कचऱ्यावर प्रक्रिया करायची, असा आदेश पालिकेने दिला. त्याला बहुतांश सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, स्वतःचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारले आहेत. अशा सोसायट्यांना पालिकेतर्फे मिळकतकरात सवलत दिली जात आहे. असे असूनही शहरातील वाढती लोकसंख्या व कचऱ्याचे वाढते प्रमाण यामुळे मोशी डेपो येत्या काही वर्षात पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे. त्याला पर्याय म्हणून ताथवडे व पुनावळेतील जागेची चाचपणी सुरू आहे. परंतु, त्याला स्थानिकांनी विरोध केला. त्यातच पुण्यातील कचरा टाकण्यासाठी मोशीतील गायरान जमीन देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यालाही रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 

वल्लभनगर डेपो 
पुणे-नाशिक महामार्गालगत नाशिक फाटा ते वल्लभनगरदरम्यान खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. त्याला दरवर्षी उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना घडतात. त्याच्या धुराचा वल्लभनगर, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, सीआयआरटी, एसटी बस स्थानक परिसरातील नागरिकांना त्रास होतो. तक्रारी करूनही उपाययोजना केली नाही. 

देहूरोडचा कचरा 
निगडीतील भक्ती-शक्ती चौक, ओटास्कीम, रुपीनगर, त्रिवेणीनगर, सेक्‍टर २२, ज्योतिबानगर आदी भागाला देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची हद्द लागून आहे. हा परिसर मोकळा असून बोर्डाच्या हद्दीतील कचरा येथे टाकला व जाळला जातो. त्याचा धूर व दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होतो. अर्ज, विनंत्या करूनही बोर्डाकडून कचरा टाकला जात असल्याने नागरिकांत नाराजी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage Issue City Saving Pollution