रोकेम प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नाही

रोकेम प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नाही

पुणे - शहरात जमा होणाऱ्या शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन महापालिका करीत असतानाच सातशे टन क्षमतेच्या रोकेम प्रकल्पांतर्गत केवळ अडीचशे ते तीनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण क्षमतेने चालणे अपेक्षित असूनही ते अद्यापपर्यंत झालेले नाही. प्रकल्पाच्या उभारणीतील त्रुटींमुळेच कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचे उघड झाले असून, हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहरात रोज साधारणत: १ हजार ६०० टन कचरा जमा होतो. त्यावरील १ हजार १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २३ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यापैकी सातशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने हडपसरमधील रामटेकडी येथे २०१२ मध्ये रोकेम प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पात सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून विटा करण्याचा उद्देश होता. त्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले. प्रकल्प नवे असल्याचे कारण देत, सुरवातीला काही महिने अडीचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याचे कंपनीने महापालिकेला कळविले होते. या परिस्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही. 

दरम्यान, या प्रकल्पाच्या आवारातील कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्याने मोठे नुकसान झाले होते. परिणामी,  महिनाभर प्रकल्प बंद पडला होता. त्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेऊन पुढील सहा महिन्यांत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. प्रत्यक्षात ही मुदत संपूनही प्रकल्प निम्म्या क्षमतेनेही सुरू नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांत या प्रकल्पाची क्षमता निम्म्यापर्यंत पोचलेली नाही.

या प्रकल्पाच्या माध्यमातून रोज ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. ती वाढविण्यात येणार आहे. त्याबाबत संबंधित कंपनीला सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाठपुरावा करण्यात येईल.’’ 
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com