रेड झोनच्या जागेत कचऱ्याचे ढीग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

भोसरी - दिघीतील भारत मातानगरजवळील रेड झोनमधील मोकळ्या जागा म्हणजे कचराडेपो झाला आहे. परिसरातील नागरिक कचरा, राडारोडा टाकत आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ही समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी आहे. 

भोसरी - दिघीतील भारत मातानगरजवळील रेड झोनमधील मोकळ्या जागा म्हणजे कचराडेपो झाला आहे. परिसरातील नागरिक कचरा, राडारोडा टाकत आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ही समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी आहे. 

आळंदी रस्त्याला लागून रेड झोनचा पट्टा आहे. तेथे असलेल्या मोकळ्या जागेत राडारोड्याबरोबर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसराला कचराडेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सफाई कामगारांनी केलेल्या संपामुळे कचरा अधिकच साचल्याचे आरोग्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, रविवारी संप मिटला तरी कचऱ्याचे ढीग जैसे थे आहेत. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांची आहे.

दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक चारमधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी चारही नगरसेवक आणि आरोग्याधिकाऱ्यांची गुरुवारी (ता. ४) बैठक झाली. या बैठकीत रात्री कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रात्रपाळीतही कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे रात्री कचरा आणि राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.  

भोसरीतील आळंदी रस्त्यावरील कै. रामभाऊ गबाजी गवळी बोलोद्यानात महापालिकेतील पहिले बंदिस्त कचरा संकलन केंद्र आहे. या संकलन केंद्रापासून अगदी तीनशे मीटरवर असलेल्या भारत मातानगरजवळील मोकळ्या जागेतच कचरा हा संकलित होतो.

भारत मातानगरजवळील मैदानातील कचरा बुधवारी उचलण्यात आला होता. मात्र, परिसरात घंटागाडी येत असतानाही रात्री उशिरा कचरा टाकतात. घंटागाडी येत नसल्यास नागरिकांनी तक्रार करावी.
- सुधीर वाघमारे, आरोग्य निरीक्षक, आरोग्य विभाग

Web Title: Garbage in Red Zone Place