'वाय-फाय'साठी उद्यानांची खोदाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्यानात "वाय-फाय' सुविधा पुरविताना बेकायदा खोदाई सुरू आहे, झाडे तोडली जात आहेत, जॉगिंग ट्रॅक उखडले आहेत. परिणामी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगत, उद्यानामधील सरसकट खोदाई थांबविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. या कामासाठी "एल ऍण्ड टी' कंपनीची नेमणूक का केली, असा प्रश्‍नही सदस्यांनी विचारला.

पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्यानात "वाय-फाय' सुविधा पुरविताना बेकायदा खोदाई सुरू आहे, झाडे तोडली जात आहेत, जॉगिंग ट्रॅक उखडले आहेत. परिणामी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगत, उद्यानामधील सरसकट खोदाई थांबविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. या कामासाठी "एल ऍण्ड टी' कंपनीची नेमणूक का केली, असा प्रश्‍नही सदस्यांनी विचारला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच, उद्यानांमध्ये सरसकट खोदाई करण्यात येत असल्याकडे दिलीप बराटे यांनी लक्ष वेधले. ही कामे करताना स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या उद्यानातील सेवा-सुविधांची दुरवस्था झाल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले. मुळात "एल ऍण्ड टी' कंपनीला काम देताना सर्वसाधारण सभेची परवानगी घेतलेली नाही, असा आरोप कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला.

विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, 'विकासकामे करताना दृष्टी असायला हवी. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत, "वाय-फाय'साठी उद्यानामधील झाडे, लॉन काढण्यात येत आहेत. या सुविधेसाठी उद्यानांची निवड कशी केली, त्यासाठी नगरसेवकांना विश्‍वासात घेतले आहे का?''
 

अविनाश बागवे म्हणाले, ही सुविधा पुरविण्याचे काम एकाच कंपनीला देण्याचा घाट का? योजना लोकांसाठी नव्हे तर, ठेकेदाराच्या भल्यासाठी आखली आहे.''

दीपक मानकर म्हणाले, 'विविध सेवा पुरविण्यासाठी रिलायन्स कंपनीला खोदाईची परवानगी देण्यापूर्वी "इंटरनेट'च्या सेवेबाबत कंपनीशी करार करण्यात आला होता. मात्र, कंपनीने महापालिकेची फसवणूक केली असून, त्याबाबत प्रशासनाने कोणती ठोस पावले उचलली.''

महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, ""स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 128 ठिकाणी "वाय-फाय' पुरविण्यात येणार आहे. त्यात 82 उद्याने आणि 46 रुग्णालये आहेत. मात्र, ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने खोदाई केली आहे, त्याची दुरुस्ती केली जाईल. त्याबाबत कंपनीला सूचना केल्या आहेत.''

दरम्यान, आंबिल ओढ्यातील नाल्यात वाहून गेलेल्या मुलाच्या नातेवाइकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

भाजपचा प्रयत्न फसला
कोरेगाव पार्कमधील रमाई आंबेडकर उद्यानात माता रमाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा ठराव बहुमताच्या जोरावर पुढे ढकलून सभा तहकूब करण्याचा भाजपचा प्रयत्न सर्वसाधारण सभेत फसला. महापालिकेत भाजपचे 98 सदस्य असल्याने हा ठराव एक महिना पुढे ढकलून सभा तहकूब करण्याचा प्रयत्न सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केला. मात्र रमाबाई यांच्या पुतळ्याला विरोध का करता, असा प्रश्‍न विचारून कॉंग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केल्याने सभागृह नेत्यांनी हा विषय जाहीर करून त्यावर उपसूचना घेत हा विषय मान्य केला.

स्वतःचा स्पीकर, माईक
महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी स्पीकर आणि "माईक' घेऊन सभागृहात प्रवेश केला. महापालिकेच्या मंगळवारच्या सभेत तुपे यांच्या आसनापुढील माईक बंद करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून तुपे यांनी स्वतः स्पीकर आणि माईक घेऊन सर्वसाधारण सभेला उपस्थित होते.

Web Title: garden digging for wi-fi