Geet Ramayan : ..अन् तब्बल सहाशे चिमुकल्यांनी नृत्य, नाट्यातून उलगडले 'गीतरामायण'! केले दोन रेकॉर्ड

'गीतरामायण'च्या कलाविष्काराने पालक, ज्येष्ठ नागरिक भारावले, लोहिया मातृमंदिर शाळेकडून "वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल' आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' विक्रम.
Geet Ramayan Childrens
Geet Ramayan Childrenssakal

पुणे - श्रीरामजन्माचा आनंदोत्कट क्षण... राम, सीता, लक्ष्मण वनवासाला निघाल्यानंतर अयोध्यावासीयांच्या भावनांचा उठलेला कल्लोळ...अन् हनुमानाच्या भेटीपासून ते सीतेची लंकेतून सुटका करीत रावणाच्या वधापर्यंत, एक, दोन नव्हे तर गीतरामायाणातील तब्बल ३० प्रसंग, नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून डीईएस पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन तासात उलगडले !

लहानग्यांच्या या अनोख्या कलाविष्काराने उपस्थितांची मने तर जिंकलीच, त्याशिवाय "वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल' आणि "वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' दोन विक्रमांवर आपली मोहोर उमटविली!

अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर उद्‌घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर टिळक रस्त्यावरील डीईएस पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेच्यावतीने 'गीत रामायण' कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गदिमांचे पुत्र व गायक आनंद माडगुळकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. राजश्री ठकार, शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आदी उपस्थित होते. बर्वे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमात शाळेतील अडीच ते साडेपाच या वयोगटातील सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रामायणातील विविध घटनाप्रसंग उलगडले.

डीईएस शाळेच्या पटांगणात सायंकाळी सहा वाजता मुलांनी गीतरामायण' सादरीकरणाला सुरवात झाली. रामजन्मापासून अनेक प्रसंग विद्यार्थ्यांनी आनंदोत्साहात सादर केले. उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला साथ दिली जात होती. यावेळी "जय श्रीराम'च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारून निघाले.

रात्री नऊ वाजता कार्यक्रम संपल्यानंतर काही क्षणातच शाळेने 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल' आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' दोन विक्रमांवर नाव कोरल्याचे जाहीर करण्यात आले. त्याबाबतचे प्रमाणपत्र मुख्याध्यापिका बर्वे यांना प्रदान करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला. तर उपस्थित चार हजार नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com