जेनेरिक ‘खपा’त मागे

योगिराज प्रभुणे - @yogirajprabhune 
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पुणे - कोणत्याही ब्रॅंडेड कंपन्यांच्या महागड्या औषधांपेक्षा त्याच औषधांमधील मूलद्रव्यांचा समावेश असलेल्या आणि ब्रॅंडेडपेक्षा कितीतरी स्वस्त असलेल्या जेनेरिक औषधांवर रुग्णांचा पूर्ण विश्‍वास आहे. मात्र, खपाच्या पातळीवर ही औषधे ब्रॅंडेड औषधांपेक्षा खूपच मागे असल्याचे ‘सकाळ’च्या एका पाहणीत आढळून आले आहे. 

पुणे - कोणत्याही ब्रॅंडेड कंपन्यांच्या महागड्या औषधांपेक्षा त्याच औषधांमधील मूलद्रव्यांचा समावेश असलेल्या आणि ब्रॅंडेडपेक्षा कितीतरी स्वस्त असलेल्या जेनेरिक औषधांवर रुग्णांचा पूर्ण विश्‍वास आहे. मात्र, खपाच्या पातळीवर ही औषधे ब्रॅंडेड औषधांपेक्षा खूपच मागे असल्याचे ‘सकाळ’च्या एका पाहणीत आढळून आले आहे. 

‘सकाळ’ने या पाहणीसाठी शहराचे नऊ भाग पाडले. त्यात सिंहगड रस्ता, कात्रज-धनकवडी, येरवडा-विश्रांतवाडी, हडपसर-नगर रस्ता, खडकी, औंध-बाणेर, पाषाण-सूस, कोथरूड-कर्वेनगर, तसेच मध्य वस्तीतील सदाशिव-नारायण-शनिवार पेठ या भागांचा समावेश होता. प्रत्येक भागातील निवडक औषध दुकानांमध्ये येणाऱ्या सुमारे वीस नागरिकांकडून जेनेरिकबाबतच्या अगदी मूलभूत अशा सात मुद्द्यांची प्रश्‍नावली भरून घेण्यात आली. औषध खरेदीसाठी दुकानात आलेल्या रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाइकांकडून एकूण १८० प्रश्‍नावली भरून घेण्यात आल्या. संगणकीय प्रणालीद्वारे त्यांचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यातून जेनेरिकबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष हाती आले आहेत.

पुणेकर जेनेरिकबाबत जागृत
जेनेरिक औषधांबद्दल शहर आणि उपनगरांमध्ये पुरेशी जनजागृती झाली आहे. ‘माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या’ हा या माहितीचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे पुण्यातील ८९ टक्के नागरिकांनी जेनेरिक औषधांबद्दल त्यांना माहिती असल्याचे सांगितले. औषध खरेदीसाठी दुकानात आलेल्या उर्वरित दहा टक्के ग्राहकांना जेनेरिक औषधांची माहिती नव्हती, त्यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण आहे. 

जेनेरिक औषधांवर विश्‍वास
पुणेकर ग्राहकांचा जेनेरिक औषांवर विश्‍वास असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ‘जेनेरिक औषधांवर तुमचा विश्‍वास आहे का,’ या प्रश्‍नाचे ८३ टक्के नागरिकांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. दहा टक्के लोक जेनेरिकबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांनी ‘माहिती नाही’ असे उत्तर दिले; तर ‘विश्‍वास नाही’ असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण अवघे ७ टक्के आहे.

खरेदी मात्र ब्रॅंडेड औषधांची
पुणेकरांना ब्रॅंडेड आणि जेनेरिक औषधांमधल्या फरकाची प्राथमिक माहिती आहे, पण आश्‍चर्यकारकरीत्या प्रत्यक्ष औषध खरेदीची वेळ येते तेव्हा ब्रॅंडेड औषधांनाच प्राधान्य मिळते. औषध खरेदीसाठी आलेल्या ९२ टक्के ग्राहकांनी ब्रॅंडेड औषधांची खरेदी केली. आठ टक्के रुग्णांनी जेनेरिक औषधे विकत घेतली.

पसंती जेनेरिकलाच
जेनेरिक आणि ब्रॅंडेड यात गुणात्मकदृष्ट्या काहीच फरक नसतो. जेनेरिक ही ब्रॅंडेड औषधांइतकीच गुणकारी असतात, मात्र ती उपलब्ध झाली तर जेनेरिक औषधांच्या खरेदीसाठी प्राधान्य देऊ, असे मत ९१ टक्के नागरिकांनी नोंदविले. उर्वरित नऊ टक्के ग्राहकांनी ब्रॅंडेड औषधेच घेऊ, असे ठामपणे सांगितले. 

Web Title: generic medicine sailing decrease