Video : जर्मन बेकरी बाँबस्फोटाच्या वेदना ताज्याच

कोरेगाव पार्क - जर्मन बेकरी बाँबस्फोटास गुरुवारी (ता. १३) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतरच्या मोठ्या संघर्षाला सामोरे जात पुन्हा दिमाखात सुरू असणारी बेकरी.
कोरेगाव पार्क - जर्मन बेकरी बाँबस्फोटास गुरुवारी (ता. १३) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतरच्या मोठ्या संघर्षाला सामोरे जात पुन्हा दिमाखात सुरू असणारी बेकरी.

पुणे - परदेशी नागरिकांचं हक्काचं ठिकाण असलेल्या कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीतील बाँबस्फोटाला गुरुवारी (ता. १३) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. तमाम पुणेकरांच्या काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेच्या वेदना दशकानंतरही ताज्याच असल्या तरी ‘दहशतवादाला आम्ही जुमानत नाही’, हेच त्यांनी पुन्हा भरारी घेत सिद्ध केले आहे.

कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६.५० वाजता बाँबस्फोटाने हादरली. काळाकुट्ट अंधार, काळीज चिरणाऱ्या किंकाळ्या, चहुकडे पडलेला रक्तमांसाचा चिखल, छिन्नविछीन्न मृतदेह... हात व शब्द गमावल्यानंतर केवळ नजरेतून मदतीसाठी होणारी याचना... अशा संकटात स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात दिला. अनेकांचे जीव वाचविले. 

‘एखाद्याचा जीव वाचविण्याइतका दुसरा आनंद नाही,’’ असे सांगतानाच, ‘‘त्या दहशतवादी हल्ल्यामुळे आम्ही मुळीच घाबरलो नाही. उलट आता एकजुटीने लढण्यास सक्षम झालो आहोत,’’ अशी भावना बेकरी मालकांसह परिसरातील रहिवासी, डॉक्‍टरांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. काही जण अजूनही बाँबस्फोटाच्या जखमा अंगावर वागवताहेत.

पुण्यातील बाँबस्फोटाची पहिलीच घटना येथे घडली. त्या वेळी स्थानिक नागरिक, सरकार व पोलिसांनी मदत केली. आम्ही दहशतवादाला घाबरणारे नाहीत, हेच आम्ही बेकरी पुन्हा सक्षमपणे उभी करून सिद्ध केले. त्यानंतर सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देऊ लागलो.
- स्नेहल खरोसे, मालक, जर्मन बेकरी

बेकरीच्या वर आमचे क्‍लिनिक आहे. त्या घटनेचा आमच्यासह अनेकांच्या व्यवसायाला फटका बसला; पण दहा वर्षांत आम्ही हळूहळू भरारी घेत आहोत. दहशतवादाला पुणेकर कधीही भीक घालणार नाहीत.
- डॉ. मानसी जाधव, डेंटर आर्ट स्टुडिओ

घटना घडल्यानंतर तिथे पहिल्यांदा आम्ही पोचलो. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले. त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाला. तर काही जण वाचले. त्यांचा जीव वाचविल्याचा आनंद कायम राहील.
- योगेश वाघेला, रहिवासी, बर्निंग घाट वसाहत

आता सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, पोलिसांची गस्त, तरुणांकडून सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. पूर्वीच्या तुलनेत आम्ही अधिक सजग झालो आहोत.
- मनोहर कालगुडे, केबल कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com