esakal | जमिनीच्या दाव्यांची आता घरबसल्या मिळवा माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile App

जमिनीच्या दाव्यांची आता घरबसल्या मिळवा माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महसूल अधिकाऱ्याकडे तुम्हाचा जमिनीविषयक (Land) दावा (केस) सुरू आहे. त्याची तारीख कधी आहे, किती वाजता त्यावर सुनावणी होणार आहे, यांची माहिती (Information) आता महसूल कार्यालयात अथवा वकिलांकडे जाऊन घेण्याची गरज नाही. कारण ‘ईक्‍युजे कोर्ट लाइव्ह केस बोर्ड’ या मोबाईल ॲपवरून तुम्हाला ही माहिती घर बसल्या पाहता येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीनविषयक दाव्यांवर सुनावणी घेतली जाते. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केसचा निकाल लागल्यानंतर पुढील अपील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल होते. या दाव्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या कार्यालयात विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या लक्षणीय असते. मात्र, दाव्यांची सुनावणी कधी होईल हे निश्‍चित नसल्यामुळे नागरिक सकाळपासून उपस्थित राहतात.

हेही वाचा: गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्या - डॉ.रविंद्र शिसवे

पक्षकार व वकिलांचा वेळ वाचविण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पुढाकार घेत ‘ईक्‍युजे कोर्ट लाइव्ह केस बोर्ड पुणे कलेक्‍टर ऑफिस’ हे ॲप बनविले आहे. त्याचा वापरही डिसेंबरपासून सुरू झाला आहे. त्यामध्ये सुधारणा करीत विविध सुविधा या माध्यमातून नागरिकांना देण्यात येत आहे. या ॲपवर दाव्याची वेळ दिली जाते. त्यामुळे दिलेल्या वेळेनुसार नागरिक सुनावणीसाठी उपस्थित राहू शकतात. सुनावणी होणार नसेल, तर त्याची माहितीसुद्धा ॲपवर दिली जाते. यामुळे नागरिकांची वेळेची आणि पैशाचीही बचत होते.

प्रशासन आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे ॲप विकसित केले आहे. त्याचा वापर केल्यावर दाव्याची तारीख आणि सुनावणीची वेळ मोबाईलवर समजते. पुढच्या टप्प्यात या ॲपवर दाव्याचा निकाल लागल्यानंतर निकालाची समजही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी

loading image
go to top