नोटाबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - ""नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून, त्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या भावनांचा विचार करून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे आणि आंदोलनाची धग देशभर पोचवावी,'' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात केले. 

पुणे - ""नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून, त्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या भावनांचा विचार करून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे आणि आंदोलनाची धग देशभर पोचवावी,'' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात केले. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे नेते अजित पवार, शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात पक्ष कार्यकर्त्यांनी लोकांच्या बाजूने उभे राहावे. पंतप्रधानांनी विश्‍वास देऊनही गेल्या 50 दिवसांमध्ये पुरेसे पैसे मिळाले नाहीत. दिवसेंदिवस लोकांची अडचण वाढतच आहे. परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नसल्याने या विरोधात जोरदार आंदोलन करावे लागेल. त्यात कुठेही मोडतोड होणार नाही, याची काळजी घ्या. आंदोलनाचे चित्र देशभर पोचले पाहिजे.'' 

""देशात गेल्या काही काळात धर्मगुरूंचे प्राबल्य वाढत आहे. प्रतिगामी शक्तीला विरोध करीत, पक्ष कार्यकर्त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. मागासवर्गीयांना दिलेल्या सवलतींना धक्का न लावता इतर मागासवर्गाचे आरक्षण कायम राहिले पाहिजे. कोणाचे काढून कोणाला तरी द्यावे असे असता कामा नये,'' असेही ते म्हणाले. 

आता मुख्यमंत्री काय करतील? 
शरद पवार म्हणाले, ""काही लोक दहा अपत्यांना जन्म देण्याचे आवाहन करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना तर एकच मुलगी आहे. आता काय करतील?'' 

समविचारी पक्षांसोबतच आघाडी 
महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबतच आघाडी करण्यात येईल. त्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, आघाडी ही प्रासंगिक नसेल, ती पूर्ण पाच वर्षांकरिता असेल. निवडणुकीनंतरही समविचारी पक्षांबरोबर एकत्र येण्याचा विचार होईल; परंतु, भाजप-शिवसेना या जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही, असेही सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात आघाडी सरकारची सत्ता असतानाच निगडी ते कात्रज मेट्रो होण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या ठरावाला मंजुरी दिली. भारतीय जनता पक्ष केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रकल्पांना मंजुरी देत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

Web Title: Get off the streets to protest the ban on the notes - pawar