
पुणे शहराचे राजकारण, समाजकारण ज्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे नाव म्हणजे गिरीश बापट.
Girish Bapat : माणसं जोडणारा कामगार ते पुण्याचा खासदार !
पुणे शहराचे राजकारण, समाजकारण ज्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे नाव म्हणजे गिरीश बापट. ‘भाऊ’ या नावाने कार्यकर्त्यांना आपलासा करणारा हा सर्वसमावेशक नेता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, टेल्को कंपनीतील कामगार, सलग तीन वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पाच वेळा आमदार, मंत्री, विक्रमी मतांनी विजयी झालेले भाजपचे खासदार या कष्टातून उभ्या केलेल्या राजकीय कारकीर्द मागे होता त्यांच्यातील पक्षापलीकडचा, सर्वांना आपलासा वाटणारा ‘कार्यकर्ता’.
काही दिवसांपूर्वी कसब्यातील पोटनिवडणुकीत ऑक्सिजनच्या नळ्या लावून कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता महाराष्ट्राने पाहिला. पण बापट निवडणुकीपुरतेच पक्षाचे असायचे इतर वेळी विरोधकांनाही आपलेसे करणारा अवलिया अशीच त्यांची ओळख होती. राजकारणातील हा वेगळेपणा आणि अफाट जनसंपर्क हाच बापट यांचा श्वास होता. म्हणूनच बापट यांचे जाणे सर्वांना चटका लावणारे आहे.
गिरीश भालचंद्र बापट यांचा जन्म तीन सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडे येथे जिल्हा परिषदेत शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे माध्यमिक तर ‘बीएमसीसी’मधून त्यांनी पदवी प्राप्त केली. पदवीनंतर बापट १९७३ मध्ये टेल्को कंपनीत कामगार म्हणून रुजू झाले. टेल्कोत असतानाच त्यांच्यातील नेत्याने आकार घेतला. २०१० पर्यंत त्यांनी टेल्कोत काम केले. १९७५ मध्ये आणीबाणीत १९ महिने नाशिक जेलमध्ये कारावास भोगला.
आणीबाणीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. रा. स्व. संघ, जनसंघ आणि परिवारातील विविध संस्थांवर त्यांनी काम केले. १९८० मध्ये ते भाजपचे शहर चिटणीस झाले. १९८३ मध्ये बापट यांनी त्यांची पहिली महापालिका निवडणूक लढविली आणि लोकप्रतिनिधी मधून सुरू झालेल्या कारकिर्दीस आज निधनानंतरच फूलस्टॉप मिळाला. बापट महापालिकेवर सलग तीन वेळा निवडून आले.
महापालिकेत बापट यांचा वेगळा दबदबा होता. पक्षाची सत्ता नसताना १९८६ मध्ये ते महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष बनले. बापट यांनी कसब्याची पोट निवडणूक लढवली पण त्यांना यश मिळाले नाही. या पराभवानंतर मात्र बापट यांनी १९९५ ची विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाले.
त्यानंतर २०१४ पर्यंत सलग पाच वेळा कसब्यातून विजयी होणारे ते एकमेव आमदार ठरले. कसबा मतदारसंघ निवडणुकीसाठी तसा अवघड. अठरापगड जाती, विविध विचारसरणीचे लोक तरीही या सर्वांना जोडून एकसंध ठेवणारा धागा म्हणजे बापट होते. कसबा भाजपसाठी तसा किती कठीण हे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत लक्षात आले.
१९९५ मध्ये भाजप - शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर बापट यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या काळात त्यांनी महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावला १९९९ मध्ये एसटी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्य अशा महत्त्वाच्या मंत्री पदावर त्यांनी काम केले. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी - चिंचवड या दोन्ही महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
पालकमंत्री झाल्यानंतर बापट यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. ‘पीएमआरडीए’ची स्थापना करून ते पहिले अध्यक्ष झाले. मेट्रो त्यांच्याच काळात मार्गी लागली. मंत्रिपदी असतानाच बापट यांनी पुण्यातून लोकसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ते विक्रमी तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले.
बापट हे पुण्यातील राजकारणातील हेडमास्तर म्हणून ओळखले जायचे. पुण्यात भाजपने लोकसभेची जागा जिंकल्यानंतर आठही विधानसभा मतदारसंघांत विजय मिळविला. यात बापट यांच्या संघटन कौशल्याचा महत्त्वाचा वाटा होता. कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होणारा, कोणताही बडेजाव न करता हाकेला धावून येणारा, नागरी नियोजनाची दृष्टी असणारा नेता म्हणून ते पुणेकरांच्या कायम स्मरणात राहतील.
मतभेद असूनही मैत्री कायम!
गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी ऐकून मनाला खूप वेदना होत आहे. राजकीय मतभेद असूनही मित्रत्व टिकवणे हे बापटांचे वैशिष्ट्य होते. बापट हे खरं तर, कामगार चळवळीतील नेते. आम्ही दोघेही महापालिकेत सभासद होतो. पूर्वी जनसंघ आणि नंतर भाजपचे ते निष्ठावान कार्यकर्ते. महानगरपालिकेचे आणि शहराचे राजकारण, यामुळे आमचा परिचय वाढला.
या सहवासामध्ये विचारसरणीमुळे काही संघर्षाचे प्रसंग आले. त्यावेळी काही मतभेद निर्माण झाले. त्यांची भूमिका ठाम असायची. इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात आम्ही तुरुंगामध्ये एकत्र होतो. त्यावेळी आंतरिक जवळीक वाढली. परंतु राजकीय पातळीवर मतभेद कायम होते. बापट यांचा स्वभाव म्हणजे स्पष्ट होता.
पारदर्शक राजकारणावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी माझ्या आजाराच्या काळातही विचारणा करण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठवले होते. आमच्या काळातला नेता, आणि सच्चा मित्र म्हणून त्यांची नेहमी आठवण येत राहील. त्यांच्या सोबत तुरुंगवासापासून ते जनसंपर्कापर्यंतचा अनुभव आजही डोळ्यासमोर जिवंत उभा आहे.
- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
गिरीशजी बापट हे नम्र आणि कष्टाळू नेते होते, त्यांनी अत्यंत आत्मीयतेने समाजाची सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव काम केले आहे. पुण्याच्या विकासासाठी ते विशेष प्रयत्नशील होते. महाराष्ट्रातील भाजपच्या वाढीमध्ये आणि पक्षबांधणीतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भेटीसाठी सर्वसामान्यांनाही सहज उपलब्ध होऊ शकणारे ते खासदार होते.
— नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. बापटजी शेवटच्या श्वासापर्यंत देश व संघटनेच्या हितासाठी समर्पित राहिले. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण संघटन त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहे. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो. ॐ शांति
— अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, कणखर आणि मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. विरोधकांनाही आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली.
— एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
गिरीश बापट यांनी पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरू शकणार नाही. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते.
— देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
गिरीश बापट यांच्या निधनाने आम्ही आमचा आधार, मार्गदर्शक व शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाचे हित जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले. भाजपची मोठी शक्ती निघून गेली. भाजपचा कार्यकर्ता किती प्रामाणिक असतो हे त्यांच्याकडून आम्ही पाहिले आहे. सर्व पक्षातील लोकांचे त्यांच्यावर प्रेम होते.
— चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
राजकारणातल्या जुन्या वळणाचा उत्तम माणूस म्हणून गिरीश बापट यांची ओळख होती. शिवसेना भाजप युती असताना ज्यांनी युती टिकावी यासाठी मनापासून प्रयत्न केले. होते. सगळ्यांना एकत्र ठेवणारा दिलदार नेता. अशी त्यांची कीर्ती होती. शिवसेनेशी त्यांचा विशेष स्नेह होता.
— उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री