शपथ देताना काकडे- बापटांत जुगलबंदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - ""छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पुण्यात खासदार, आठ आमदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, जे उमेदवार अनुपस्थित आहेत, त्यांना सन्मानाने बोलावून घ्या आणि शपथ द्या,'' असे वक्तव्य खासदार संजय काकडे यांनी केले, तर त्यांच्या या वक्तव्याला पालकमंत्री गिरीश बापट यांनी ""केवळ पैशाने काही होत नाही, तर विकासासाठी इच्छाशक्ती लागते. येथे बांधिलकी व्यक्तीशी नाही, तर पक्षाशी आहे. हा पक्ष सोम्या-गोम्यांचा, आलेल्या-गेलेल्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांच्या कष्टातून निर्माण झाला आहे, त्यामुळे आम्हाला कोणी डिवचू शकत नाही,'' असा टोला मारला.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या उमेदवारांना सिंहगडावर शपथ देताना बापट- काकडे यांच्यात रंगलेली जुगलबंदी सोमवारी चर्चेचा विषय ठरली. भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना सुशासन, पारदर्शक व्यवहार आणि भ्रष्टाचारमुक्त कामगिरीसाठी दानवे, बापट, काकडे, खासदार अनिल शिरोळे आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत सकाळी शपथ देण्यात आली. त्या वेळी पक्षाचे बहुतेक उमेदवार, तसेच आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, संघटनमंत्री रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.

गोगावले यांनी प्रास्ताविकात, "उमेदवारांना शपथ दिल्यावर पालकमंत्री आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष मार्गदर्शन करतील,' असे जाहीर केले. त्या वेळी काकडे यांनी हस्तक्षेप करून दोन्ही खासदार बोलतील, असे गोगावले यांना सांगितले. त्यावर "पूर्वनियोजित रचनेनुसार कार्यक्रम घ्या', अशी सूचना बापट यांनी केली. त्यानंतर गोगावले यांनी काकडे यांना दोन शब्द व्यक्त करण्यास सांगितले, तेव्हा काकडे यांनी बापट यांचा नामोल्लेख करीत भाषणाला सुरवात केली. ते म्हणाले, ""बरं का बापट साहेब, खासदार- आठ आमदार निवडून आणण्यात मावळ्यांचा सहभाग मोलाचा आहे. हा गड सर करताना सिंह गेला; पण पुणे महापालिका काबीज करताना गडही येणार आणि सिंहही येणार आहे.'' महापालिका निवडणुकीत 100 नगरसेवक आपण निवडून आणून दाखविणार आहोत. जे उमेदवार अनुपस्थित आहेत, त्यांना सन्मानाने बोलावून घ्या आणि शपथ द्या, अशी सूचना त्यांनी केली.

त्यावर बापट म्हणाले, ""केवळ पैशाने काही होत नाही, तर इच्छाशक्ती लागते. ती आम्ही मेट्रो, रिंग रोड, पीएमआरडीएच्या माध्यमातून दाखवून दिली आहे.'' यानंतर दानवे यांनी शपथ दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंहगडावर फुलांची रोषणाई करण्यात आली होती आणि सनई- चौघड्यांच्या निनादात गोगावले यांनी उमेदवारांना शपथ देऊन मार्गदर्शन केले.

Web Title: girish bapat- sanjay kakade