वडिल व मुलगी निघाले होते दुचाकीवरून..मागून आला सुसाट ट्रक

मकरंद ढमाले
शुक्रवार, 29 मे 2020

मुळशी तालुक्यातील जामगाव येथे पुणे- कोलाड रस्त्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

माले (पुणे) : मुळशी तालुक्यातील जामगाव येथे पुणे- कोलाड रस्त्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अक्षरा मोहन काला (वय 12, रा. जामगाव), असे तिचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. 

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, मोहन काला हे सोमवारी सकाळी त्यांच्या मुलगी अक्षरा हिला घेऊन दुचाकीने पौडकडे चालले होते. मोहन हे दुचाकी चालवत होते व अक्षरा मागे बसली होती. या मार्गावर सध्या पुणे- कोलाड रस्त्याच्या कांक्रिटीकरणाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. जामगाव व शेरे गावच्या हददीवर मामासाहेब मोहोळ विद्यालयाजवळ आल्यावर कोकणातून पुण्याकडे माल घेऊन जाणाऱया भरधाव ट्रकची ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काला यांच्या दुचाकीस मागील बाजूने जोरदार धडक बसली. 

शिरूर शहरावर कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार

या अपघात मोहन काला हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर अक्षरा ट्रकच्या चाकांखाली पडली. ट्रकने तिला काही अंतर फरफटत नेले. ट्रकचे चाक तिच्या डोक्‍यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मोहन काला यांनाही मार लागला. पोलिसांनी ट्रकचालक किरण सुभाष जाधव (रा. मोरवा, ता. माणगाव, जि. रायगड) यास ताब्यात घेतले आहे. 

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...

रस्त्याच्या अर्धवट कामांचा दुसरा बळी 
पुणे- कोलाड रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे. कोणती लेन वापरावी याबाबत सुचना फलक अत्यंत दुर्मीळ आहेत. कंत्राटदाराने सुचना फलक लावणे, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या उपाय योजना करणे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा हा दुसरा बळी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या अर्धवट कामांत अपघातात भुकूम येथेही तरुणाला जीव गमवावा लागला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl dies on the spot after truck collides with motorcycle at Jamgaon in Mulshi taluka