निघाली होती नगरच्या लोणीला, पोहचली पुण्याच्या लोणीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

कावेरी तीन दिवसांपुर्वी तिच्याच शाळेतील कार्यक्रम पाहण्यासाठी गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर घऱी जात असताना, तिने एका वाहनाला हाथ करुन लोणीत सोडण्याची विनंती केली. मात्र संबधित वाहनचालकाने तिला अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावात सोडण्याऐवजी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ आणुन सोडले होते. 

लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे छत्र पुन्हा मिळाले आहे.

कावेरी राजू पवार (वय-१३,रा. लोणी, ता. राहता जि. नगर) हे त्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. कावेरी तीन दिवसांपुर्वी तिच्याच शाळेतील कार्यक्रम पाहण्यासाठी गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर घऱी जात असताना, तिने एका वाहनाला हाथ करुन लोणीत सोडण्याची विनंती केली. मात्र संबधित वाहनचालकाने तिला अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावात सोडण्याऐवजी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ आणुन सोडले होते. 

नवीन गाव, नवीन परिसर त्यामुळे कावेरी प्रचंड घाबरली व घाबरून रडू लागली. यावेळी रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का परिसरात मनोज कल्याण काळभोर यांनी तिला पहिले. मनोज काळभोर यांनी प्रथम तिला जेवू घातले. तिची विचारपुस केेली असता, कावेरी ही चुकुन नगर जिल्ह्यातील लोणीच्या ऐवजी पुणे जिल्हातील लोणी पोहचल्याची मनोज काळभोर यांना खात्री पटली. यावर मनोज काळभोर यांनी ही बाब तात़डीने लोणी काळभोर पोलिसांना कळवली. 

दरम्यान, लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, ठाणे अंमलदार संतोष शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कावेरीला पोलिस ठाण्यात तिच्याकडे पुन्हा एकदा घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करुन तिच्याकडुन वडिलांचा मोबाईल क्रमांक घेतला. तसेच मोबाईलवर फोन करून तिच्या वडिलांना कावेरी बद्दल माहिती दिली. यावर कावेरीच्या नातेवाईकांनी शनिवारी सकाळी पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्याकडेही अधिक चौकशी करुन कावेरीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. 

मालधक्क्यात सुपरवाईझर असणारे मनोज काळभोर व पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या समयसुचकतेमुळे एका अल्पवयीन मुलीला आई-वडिलांचे मायेचे छत्र पुन्हा मिळाले. या कामगिरीबद्दल क्रांतीकुमार पाटील व मनोज काळभोर यांचा नातेवाईकांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl lost in pune got her parents back