अल्पवयीन मुलीचा  वडगावमध्ये खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

वडगाव एमआयडीसी रस्त्यावरील एका हॉटेलमधील खोलीत बुधवारी दुपारी एका तरुणाने नवलाख उंब्रे येथील एका अल्पवयीन मुलीचा हत्याराने वार करून खून केला.

वडगाव मावळ - वडगाव एमआयडीसी रस्त्यावरील एका हॉटेलमधील खोलीत बुधवारी दुपारी एका तरुणाने नवलाख उंब्रे येथील एका अल्पवयीन मुलीचा हत्याराने वार करून खून केला.  श्रीराम सुग्रीव गिरी (रा. तळेगाव दाभाडे) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गिरीने बुधवारी सकाळी अकराला संबंधित मुलीस फूस लावून हॉटेलमध्ये आणले. दुपारी साडेतीनपर्यंत ते हॉटेलमधील खोलीत होते. त्यानंतर हा तरुण तेथून फरारी झाला. हॉटेल व्यवस्थापकाने खोलीत जाऊन पाहिले असता, ही तरुणी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर, पोटावर व हातावर वार केल्याचे आढळून आले. हॉटेल व्यवस्थापकाने या घटनेची माहिती वडगाव पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीतकुमार कावत आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी हॉटेलच्या रजिस्टरवरील नोंदीवरून गिरी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पकडण्यासाठी सहा पथके रवाना केल्याची माहिती पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली. वडगावचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर पुढील तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl murder in Wadgaon