मुलीची लादलेल्या मातृत्वातून अखेर सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

पुणे - बलात्कारातून गरोदर झालेल्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या लढ्याला यश आले. उच्च न्यायालयाने संबंधित मुलीला गर्भपात करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे तिची लादलेल्या मातृत्वातून सुटका झाली. 

पुणे - बलात्कारातून गरोदर झालेल्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या लढ्याला यश आले. उच्च न्यायालयाने संबंधित मुलीला गर्भपात करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे तिची लादलेल्या मातृत्वातून सुटका झाली. 

स्वारगेट परिसरात राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीला तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले. सुखी संसाराचे खोटे स्वप्न दाखवून बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. मुलगी गरोदर असल्याचे समजताच त्याने तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने सर्व प्रकार घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या गर्भपाताचा निर्णय घेतला. मात्र, अशा प्रकरणात गर्भपात करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज असते. त्यासाठी पीडित आणि तिची आई जिल्हा न्यायालयात आल्या. त्या वेळी त्यांचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मार्गदर्शन केले. तसेच, गर्भपाताच्या प्रक्रियेची माहिती दिली. तुमच्यावतीने याचिकादेखील दाखल करू, असा धीर दिल्याचे प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी सांगितले. 

पीडितेकडून गर्भपात करण्याबाबतचा अर्ज घेऊन त्याच्या मंजुरीसाठी प्राधिकरणामार्फत ॲड. यशपाल पुरोहित यांची नेमणूक केली. त्यानुसार ॲड. पुरोहित व मुंबई येथील ॲड. तेजस दंडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने संबंधित सरकारी दवाखान्याचा अहवाल मागवून याचिका मंजूर करून गर्भपाताची परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशाची प्रत दवाखान्यामध्ये सादर केल्यानंतर आठ दिवसांत त्या मुलीचा गर्भपात करण्यात आला. ही प्रक्रिया प्राधिकरणामार्फत मोफत करण्यात आली, 

प्राधिकरणाकडून चालविण्यात आलेली अशी ही पहिलीच याचिका आहे. समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, की ज्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहीत नाहीत. कायद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहेत.
- सी. पी. भागवत, सचिव, विधी सेवा प्राधिकरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Rape Mother Crime Court Abortion Permission