मुलीचा अत्याचार करून खून

जनार्दन दांडगे
शनिवार, 16 जून 2018

लोणी काळभोर - कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील लोणी स्टेशन परिसरातील पुणे- सोलापूर महामार्गालगतच्या भरवस्तीत दुकानासमोर झोपलेल्या भिक्षेकरी महिलेच्या कुशीतून एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री घडली. 

लोणी काळभोर - कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील लोणी स्टेशन परिसरातील पुणे- सोलापूर महामार्गालगतच्या भरवस्तीत दुकानासमोर झोपलेल्या भिक्षेकरी महिलेच्या कुशीतून एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री घडली. 

दरम्यान, गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर केवळ तीन तासांच्या आत आरोपीस लोणी काळभोर परिसरातील रामदरा येथून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. हड्डी पप्या ऊर्फ मल्हारी हरिभाऊ बनसोडे (वय २२, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) असे या निर्दयी बलात्कारी तरुणाचे नाव आहे. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मयत मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली.

मयत मुलगी व तिचे नातेवाईक तमिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत. मयत मुलगी, तिची आई, आजी व आणखी दोन महिला मागील आठ दिवसांपासून लोणी स्टेशन परिसरात भीक मागून उपजीविका करीत आहेत.

मयत मुलीबरोबरच आणखी एक तीन वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा, असे एकत्रच रात्रीच्या वेळी पदपथावर झोपत होते. पाच दिवसांपूर्वी मयत मुलगी व तिचे नातेवाईक लोणी स्टेशन परिसरातील एका मंदिरात झोपले होते. त्या वेळी एका दारू प्यायलेल्या व्यक्तीने मयत मुलीच्या आईच्या अंथरुणात शिरून घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या वेळी मयत मुलीच्या आईने प्रतिकार केल्याने संबंधित व्यक्ती पळून गेल्याने पुढील अनर्थ टळला होता. त्यानंतर मयत मुलगी व तिच्या समवेत असलेल्या इतर तीन महिलांनी एका खासगी रुणालयाच्या शेजारच्या दुकानाच्या ओट्यावर झोपण्यास सुरवात केली होती. गुरुवारी (ता. १४) रात्री कपड्याचे दुकान बंद झाल्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास मयत मुलीची आई व तिचे नातेवाईक दुकानासमोर बिछाना टाकून नेहमीप्रमाणे झोपी गेले. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली. त्या वेळी आपल्या कुशीत झोपलेली मुलगी जवळ नसल्याचे आढळून आले. तिने आपल्या समवेत झोपलेल्या नातेवाइकांना उठवून मुलगी गायब झाल्याचे सांगितले. त्यानंतर परिसरात मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी आढळून आली नाही. त्यामुळे मुलीची आई व आजीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. एक वर्षाची मुलगी गायब झाल्याची बाब गंभीर असल्याने पोलिसांनीही रात्री अडीच वाजेपर्यंत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीत ठिकठिकाणी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी आढळून आली नाही. 

दरम्यान, आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुलीची आई नैसर्गिक विधीसाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एसटी थांब्याच्या पाठीमागील बाजूस गेली असता तिला तिची मुलगी विवस्त्र व मयत आढळून आली. घाबरलेल्या मुलीच्या आईने ही बाब ओरडून आपल्या नातेवाइकांना सांगितली. मराठा महासंघाचे राकेश काळभोर यांनी ही बाब तातडीने पोलिसांना कळवली. 

हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड, पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक महेश ढवाण व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुसरीकडे पोलिसांनी दुकानालगत असणाऱ्या प्यासा हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटजेची पाहणी करण्यास सुरवात केली. त्यात रात्री सव्वाअकराच्या सुमारास एक व्यक्ती मुलीला उचलून नेत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटजेमधील व्यक्ती ही हड्डी पप्या असल्याचे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व पोलिस हवालदार चमन शेख यांच्या लक्षात आले. तो रामदरा परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यास सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील करीत आहेत.

‘‘हड्डी पप्या ऊर्फ मल्हारी बनसोडे याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. चार दिवसांपूर्वी मंदिरात झोपलेल्या मुलीच्या आईच्या अंथरुणात शिरलेली व्यक्तीही तोच असल्याचे आढळून आले आहे. एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार व तिचा खून, ही बाब अतिशय गंभीर घटना आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.’’
 - महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक  

भरवस्तीतील प्रकार
मुलीचे ज्या ठिकाणावरून अपहरण झाली, ती जागा व मुलीचा मृतदेह आढळून आला ती जागा भरवस्तीत व पुणे- सोलापूर रस्त्यालगत आहेत. दोन्ही जागांमध्ये केवळ शंभर फुटांचे अंतर आहे. मात्र तरीही आरोपीने मुलीवर पाशवी बलात्कार केला. 

Web Title: girl rape murder crime